Tuesday, July 3, 2012

माझेगुरु:my honorable teachers ! ( a complete note on Guru pournima )



(आज सकाळी मी घाईत लिहिलेल्या 'माझे गुरु ' या नोट चे कौतुक आदरणीय डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी मेल पाठवून केले.'सहज सुंदर लिहिणे तुमच्याकडून शिकावे ' अशा त्यांच्या शब्दाने फुशारून गेल्याने ,उर्वरित गुरुना आठवून आता शांतपणे हि नोट पूर्ण करीत आणली आहे...)

गुरु पौर्णिमा म्हटले कि मला अनेक गुरु तेही प्रात: स्मरणीय असे आठवतात : ग्रामीण ,अतिदुर्गम भागात शिक्षिका असलेल्या  माझ्या  आई कडून मी सुंदर अक्षर,लेखन,वक्तृत्व ,मानवता,पत्र व्यवहार,जनसंपर्क आणि टोकाची सहनशीलता   शिकलो. (पण पहाटे चार ला उठून काम करायला शिकलो नाही ...)

वडलांकडून अथर्वशीर्ष शिकलो...

मित्रांकडून पोहायला वेण्णा  नदीत-  आणी नंतर आपोआप कण्हेर धरणात   कसा शिकलो हे आता आठवत सुद्धा नाही... 
हुंद्रे सर रविवारी साताऱ्याहून खास एलिमेंटरी चा तास घ्यायला यायचे ,त्यांच्याकडून वाटर कलर पेंटिंग शिकलो..
तासाला ५० पैसे लाच देवून एका मित्राकडून सायकल शिकलो..

एन.सी.सी.मध्ये जाऊन शिस्तीचे,इस्त्रीचे ,बंदुकीचे पहिले धडे शिकलो..

अकरावीत भेटायला आलेल्या जयंत देशपांडे ,अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या कडून अ.भा.वी.प .च्या माध्यमातून संगठन ,जिव्हाळा शिकलो..
गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकवणारे पण इतिहास -पर्यटनाचे जाणकार प्र.के.घाणेकर आठवतात.चहा साठी पाने लागतात,त्याची लागवड करायला टेकड्यांची मूळ झाडे तोडून त्या बोडक्या केल्या जातात,म्हणून आयुष्भर ते चहा पासून दूर राहिले.पर्यावरणाचा नाश होतो म्हणून पेट्रोल चे वाहन स्वत घेतले नाही.आयुष्यभर सायकल चालवली. त्यांच्याकडून निर्मळ निग्रह शिकलो .वनस्पती शास्त्राच्या दुसऱ्या  प्राध्यापक प्रा.हेमा साने आजही पुण्यात विजे शिवाय राहतात.त्यांच्याकडून साधेपणा शिकलो.

पत्रकारीतेत्च्या अभ्यासक्रमात नसताना डी.टी.पी.चा समावेश करणाऱ्या डॉ.किरण ठाकूर यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह शिकलो.मंगेश पाठक यांच्याकडून गोळीबंद लेख लिहायला ,विषय शोधायला शिकलो...विजय ठोंबरे यांच्या कडून समोरच्याशी आत्मीयतेने ,हळुवार कसे बोलावे हे शिकलो...

'प्रचीती ' (ज्ञान प्रबोधिनी )तील आमचे गुरु डॉ.विवेक कुलकर्णी यांनी नियोजन बद्ध काम ,अभ्यासदौरे करायला लावले ( त्यातून स्पर्धा परीक्षा केंद्र ,साखरशाळा ,ग्रामीण प्रज्ञा विकास,संघटन ,संवाद,झोपडपट्टीतील काम आम्ही केले .'विकसन हेच तत्वज्ञान -समन्वय हीच कार्यपद्धती ' हे शिकलो.) .
आर्थिक अडचणीत असताना हि मार्गक्रमण सुरु ठेवावे.दिवाळखोर माणसातील 'माणसाला' कधी दूर करू नये, हे शिरीष कुलकर्णी-वर्षा माडगुळकर यांच्या कडून मी शिकलो...

अविनाश धर्माधिकारी हे तर ज्ञानाचा सागरच आहेत. इतिहासाची भव्यता,नागरिक चळवळीची दीक्षा ,वक्तृत्व त्यांच्याकडून शिकावी..पण मी आत्मविश्वास शिकलो.नंतर अनिल शिदोरे यांनी ' कार्य शैली ' त्यांच्या स्तंभातून ,पुस्तकातून शिकवली...  खासदार अड.वंदना चव्हाण यांच्या कडून  शांतपणा-समन्वय-चिकाटी-अभ्यास , ' 'स्टेट्स मन शिप 'या गुणांचा नकळत अभ्यास करतो आहे...

पी.ए.इनामदार यांच्याकडून मी मल्टी टास्क शिकू पाहत आहे... मराठी साहित्यातील अनेक दिग्गजांकडून ,वृत्तपत्र वाचनातून मी भाषा प्रभुत्व शिकलो...श्रीराम पचिंद्रे यांच्याकडून मराठीचा संभाषण आग्रह शिकलो. .फोटोग्राफी तर निसर्गाकडे पाहत शिकलो...
काश्मीर मध्ये जाऊन मेहमान  नवाजी शिकलो...
येत गेलेल्या अडचणीतून ,सोडवणूक शिकलो...

तरी अजून बरेच शिकायचे राहिले आहे .!  

हनमंतराव गायकवाड यांच्या कडून व्यवसाय वृद्धी शिकलो नाही . माझ्या सासूबाई, यांच्याकडून नियोजनबद्ध पंगत,सहलीची तयारी  शिकायचे राहिले आहे,तर सासरयांकडून आबाल वृद्धांशी विनाविषय गप्पा रंगविण्याची हातोटी शिकलो नाही....प्रिय पत्नी गौरी कडून अप्रतिम चवीचा ,नीट-नेटका स्वयंपाक आणी टाप -टीप शिकलो नाही !

माझ्यामागून माझी कार्यालयीन  सहकारी सारिका एक्सेल शिकली ,पण मी शिकलो नाही..कोरल ड्रो ,फोटोशोप सगळेच मागे पडले आहे.अनिल देशमुख कडून स्कूटर शिकलो तर मित्र जब्बार कडून मारुती शिकलो..स्कूटर येते ,पण अजून मोटार सायकल शिकलो नाही.

आपण अजून अडाणी आहोत,हे कबूल करायची हि एक नम्र संधी ! (सब कुच्ह  सिखा हमने ,ना सिखी होशियारी ! )

परिस्थिती ,भोवताल तर रोजच काही शिकवत असते ... या गुरु जनांमुळेच आपण असतो....म्हणून ,सर्व ज्ञात -अज्ञात गुरुना वंदन... 

आपणास हि गुरु पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा !