Monday, December 15, 2014

कृषी संस्कृतीचे हे 'गोल रिंगण '

निवडणुकीच्या कामा निमित्त कोठे तरी , कृषी संस्कृतीचे हे 'गोल रिंगण ' पाहतो ,तेव्हा सुखावून जातो .
शेणाच्या गोवऱ्या थापाव्या वाटतात ,चुलीवरील गरम भाकरी काढताना हात भाजून घ्यावासा वाटतो ,अंगणी सारवण घालावेसे वाटते ,जनावरांना प्रेमाने वैरण घालावीशी वाटते ,
आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत ,हळूच त्यांचे अश्रू पुसावेसे वाटतात . 

Modi and Didi ! :मोदी, दीदी (आणि प्रबोधन माध्यम ) !

Modi and Didi ! :मोदी, दीदी (आणि प्रबोधन माध्यम ) !
........................................
'नरेन्द्रभाई मोदी हे देशाचे पंतप्रधान झालेले पाहायला मला आवडेल आणि सर्वांचीच ती
इच्छा आहे ' असे लता ( दीदी ) मंगेशकर यांनी १ नोव्हेंबर २०१३ रोजी ऐन दिवाळीत पुण्यात उद्गार काढले आणि आज ते प्रत्यक्षात आले !
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमाला देशभरातील २५० पत्रकारांना निमंत्रित करणे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून प्रवेश देणे हि जबाबदारी 'प्रबोधन माध्यम ' या आमच्या news एजेन्सी वर देण्यात आली होती .
(आधीच्या पाटणा सभेत Bomb स्फोट झाल्याने पुण्यात अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला होता )२०१३ हे प्रबोधन माध्यम ' चे दशकपूर्ती वर्ष होते . या दशकातील ही आमची संस्मरणीय कामगिरी ठरली .
दीदींनी नरेंद्र मोदींना दिलेल्या सदिच्छा आणि मोदिनी त्याचा स्वीकार केला तो क्षण खास आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी . . .
स्थळ :गरवारे महाविद्यालय ,पुणे
संयोजक :दिनानाथ मंगेशकर रुग्णालय
प्रसिद्धी संयोजन :प्रबोधन माध्यम न्यूज एजेन्सी (दीपक बिडकर ,गौरी बिडकर )

पालगड हा एक किल्ला

६-७ जून रोजी पालगड या आमच्या गावी होतो . पालगड हा एक किल्ला आहे .(किल्ल्याची ऊंची: १३२८ फुट) लांब पायथ्याशी गावठाण आहे .
आम्ही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा किल्ला मुलांना दाखवला . किल्ला अगदी ५-७ गुंठ्या इतका लहान आहे . वरती पोहचताना दमछाक होते . मात्र पोचल्यावर आसपासच्या टापुचे विहंगम दृश्य दिसते . किल्ल्यावर दोन तोफा आहेत ,
खाली किल्लेमाचीवर मनुष्य वस्तीमध्ये एक तोफ आहे . आमचा पहिलीतील अविरत टणाटण चालत सर्वात आधी पोचला ,एरवी पुण्यात तो चालायचा ज्याम कंटाळा करतो ,
त्याचे नवीनच रूप हा किल्ले चढताना पाहायला मिळाले !

बोलो गंगा मैय्याकी जय !

'गंगेच यमुनेचैव
गोदावरी सरस्वती
नर्मदे सिंधू कावेरी
जलैस्मिन सन्निधिनकुरु ' :
हजारो भाविक गंगामातेच्या स्नानाने कृतकृत्य होतात . सायंकाळची गंगा आरती हे अखिल भारतीय संमेलन असते ' ,असे आमचे गुरु प्र के घाणेकर यांनी लिहिले आहे . पहिल्या पावसाची पांढरी माती वाहून सफेत गढूळ पाण्यात गंगास्नान करणे सोपे नव्हते . थंड पाण्यात स्नान केल्याने शिणवटा गेला . पोहण्याची हुक्की आली .
तिथल्या गुरुजींनी काही धार्मिक विधी ,दान करून घेतले . गंगापूजन ,पुष्पदान ,दीपदान केले साडेसातच्या गंगा आरती आधी तेथील विश्वस्त व्यवस्थेतील कर्मचारयानी रीतसर घोषणा करून आरतीच्या आधी दहा मिनिटे दान गोळा केले !
आदित्य ने अन्नदान केले . बाकी घाटावरील गरम वाफाळती मक्याची कणसे दिसतात छान पण आपल्यासारखी गोड नसतात . 'बाबरी भवन ' सारखी नावे गमतीशीर आहेत . मोटार सायकल चा वापर करून तयार केलेली विनामूल्य शव वाहिनी (लांबून ) पाहण्यासारखी ! अनेकांनी गंगाजल आणायला सांगितलेय . मी स्वतासाठी भगवे उपरणे घेतले गळ्यात .
हजारोंच्या संगतीत मोठे काकडे घेवून होणारी गंगा आरती हा रोज सायंकाळी होणारा उत्सव च !
दोन्ही हात वर करून गुरुजी गंगेचे पावित्र्य राखण्याची शपथ घ्यायला लावतात . 'हम गंगा मैय्याकी कि पवित्रता मान -सन्मान बनाये रखंगे. प्रदूषित नही होने देंगे . बोलो गंगा मैय्याकी जय !

पिपलकोटी

बद्रीनाथ ला ज्योतिर्मठ मार्गे जाताना पिपलकोटी हे छोटे पण सुरेख गाव लागते .त्याआधी शिवपुरी मध्ये हिमालयीन कॅम्प दिसतात .
देव प्रयाग ,रुद्र प्रयाग आणि कर्ण प्रयाग दिसतात . प्रयाग म्हणजे संगम . भागीरथी आणि अलकनंदा या नद्या देव प्रयाग ला दोन वेगळ्या रंगाचे पाणी घेवून मिळतात ,आणि पुढे गंगा म्हणून जातात .
पिपलकोटी खूप उंचावर आहे . इथे मुक्काम केला . थंड पाणी अंगावर घेतले आणी शिणवटा गायब झाला . या वर्षी भाविक आणी पर्यटक कमी असल्याने हॉटेल मध्ये उत्साहाने स्वागत झाले . पर्वताकडे तोंड असणारी रूम असणारे हॉटेल शोधून काढले . पहाटे उंच पर्वतावर सूर्याची किरणे पडलेली पाहिली . हरिद्वार - -देव प्रयाग येथील उष्ण वाऱ्यातून ,कठीण घाटातून आपण पिपलकोटी ला पोचतो आणी थंड हवा आपला ताबा घेते .
वाटेवर हेमकुंड साहिब ला किमान हजार किलोमीटर दुचाकी चालवत जाणारे शीख भाविक भेटतात ,तेव्हा ए सी गाडीत बसल्याची लाज आपल्याला वाटते . चालक म्हणतो 'ये सरदार अपने धर्म के प्रती बहोत होते है ,अन्य कोई हो नही सकता ' .
अजगरासारखा डिझाईन पेटर्ण असणारे उंच महाकाय वृक्ष ,पायऱ्यांची शेती ,ढासळलेला भलामोठा पर्वत आणी वाहणारी नदी ,शेतातून फिरणारी वानरे आपले स्वागत करतात .
पिपलकोटी म्हणजे अगत्य ! दूरच्या वाटेवर जाताना एक हिरवळ . . पावसाचा हलका शिडकावा देणारी

भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव

अक्राळ -विक्राळ पर्वतातून बद्रीनाथ ला गेल्यावर प्रवास संपत नाही .
पुढे चार किलोमीटर अंतरावर माना हे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव आहे . हे गाव पौराणिक -ऐतिहासिक महत्वाचे आहे . येथे सरस्वती नदीचा उगम आहे . व्यासांनी जेथे महाभारत लिहिले ती व्यास गुहा आहे .
गणेशानी व्यासांचे ऐकून महाभारत लिहून घेतली ती गणेश गुहा आहे . मुक्तीसाठी स्वर्गारोहण पर्वताकडे निघालेल्या पांडवांचा मार्ग येथून सुरु होतो .
सरस्वती नदी द्रौपदीला ओलांडता यावी म्हणून भीमाने प्रचंड शिळा आडवी पाडून केलेला भिमपुल येथे आहे . सरस्वती -अलकनंदा संगमही आहे . माना हे विणकरांचे गाव आहे . छान शाली ,टोप्या ,उबदार कपडे विणले जातात . माना गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे भारताची तिबेट दिशेची सीमा येथे संपते . या दिशेचे हे शेवटचे गाव आहे .
या गावाच्या शेवटी एक चहाचे दुकान आहे . तेथे 'हिंदुस्तान कि चाय कि आखरी दुकान ' आहे . नरेंद्र मोदी पोहोचायच्या आधी आम्ही तेथे पोहोचून चहा घेतला आणि फोटोही काढून घेतला . इतके विविधांगी महत्व असलेले गाव दुसरे कोणतेही नसावे . .

बद्रीनाथ ,बद्री नारायण !

बद्रीनाथ ,बद्री नारायण !
----------------------------------
हिमालयात सर्वत्र शंकराचा वास असताना बद्रीनाथ मात्र विष्णूचे स्थान आहे . बौद्ध काळात थोलीन्गमठ (तिबेट ) मध्ये बद्रीनाथ होते ,मात्र बौद्ध प्रभाव वाढल्याने ते बद्रीनाथ येथे आले असे मानतात . बद्रीनाथ ला जाण्याचा मार्ग अजूनही खडतर आहे . डोंगर , दरडी कोसळून भीती वाटेल अशा कच्च्या रस्त्याने ,अक्राळ -विक्राळ दगडी खिंडींतून ,नदीतून जावे लागते . बद्रीनाथ ची उंची ३५८३ मीटर (१० हजार फुट )आहे
वाटेत बर्फ लागतो . बद्रीनाथ ला आम्ही पोचलो तेव्हा खूप कमी गर्दी होती . जेमतेम ३० भाविक होतो . एरवी पहाटे ३ पासून दर्शनाच्या रांगा लागतात . सभोवताली बर्फाची शिखरे आहेत . रोरावत धावणारी सरस्वती ,अलकनंदा नदी बद्रिनाथाच्या मंदिराच्या पायऱ्या जवळून वाहते .
नदी आणि मंदिराच्या २० फुटाच्या अंतरात तप्तकुंड हे गरम पाण्याचे कुंड आहे . नदीच्या थंड पाण्यात हात घालावासा वाटत नाही ,आणि तप्त कुंडच्या गरम पाण्यात पण सहजासहजी हात घालावासा वाटत नाही ,असा नैसर्गिक चमत्कार आहे . सकाळी स्नान केले तर तप्त कुंडाचे गरम पाणी चटका देत नाही . गरम कुंडात उतरता येते . मंदिराला अहल्याबाई होळकर यांनी अर्पण केलेला सोन्याचा कळस आहे ! हिंदू -बौधः ,जैन सर्वाना हि बद्रीनाथाची मूर्ती आपली वाटते .
आम्ही २२ जून ला दुपारी ३ वाजता दर्शन घेतले . मुक्काम केला आणि पुन्हा सकाळी दर्शन घेतले . दोन्ही वेळा तप्त कुंडात स्नान केले . एक -दोन दिवसांचा प्रवास निर्विघ्न पार पडला कि आपण बद्रीनाथ मध्ये येतो . केदारनाथ ,अमरनाथ प्रमाणे हे दर्शन पण दुर्लभ झाले आहे .
मी पुण्याहून खास सोवळे सोबत घेतले होते . ते नेसून भगवे उपरणे अंगावर घेवून दर्शन घेतले . महाराष्ट्रीय पद्धतीचे जांभळे सोवळे नेसणारा मी एकमेव भाविक होतो . थोडी कलरफुल गम्मत !
येथे बद्रीनाथाची नाणी ,पितळी वस्तू ,उपरणी यांची खरेदी झाली .
बद्रीनाथला पर्वतातून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्या पासून वाचवायला पाट बंधारे खात्याने खास व्यवस्था केली आहे .
अनेक शास्त्री येथे पूजा ,तर्पण करायला असतात . महारष्ट्रातील बाभुळकर शास्त्री पण आहेत . पितृतीर्थ येथे पूर्वजांचे एकदा श्राद्धः केले कि सात पिढ्या ना पोचते
पांडवांशी संबंधित अनेक ठिकाणे जवळपास आहेत .व्यासानी महाभारत लिहिली ती गुहा इथपासून पांडवांचे स्वर्गारोहण ,,सरस्वती नदी याच परिसरात आहे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे माना गाव येथून चार किलोमीटर अंतरावर आहे . ऐतिहासिक सरस्वती नदीचा उगम तेथे आहे . त्याबद्दलचा अल्बम आणि माहिती स्वतंत्र लिहित आहे