Monday, April 15, 2013

सिग्नल



भर दुपारी उन्ह जाळ काढत असताना एका ठिकाणी निघालो होतो . मोठा सिग्नल होता .

हमखास भिकारी असतात तिथे .

सवयीने मी काही तरी काढून त्यांना देत असतोच . ( आणि बहुतेक वेळा मला माझ्या व्यवसायाची बिले काढताना 'या ' मंडळींचीच आठवण येत असते ! जो इतरांकडून पैसे घेतो ,तो याचकच असतो बहुतेक वेळा )

आज चित्र वेगळे होते .
सूर्य पेटलेला असताना एक काळी कभिन्न आणि अपंग जोडी भिक मागत होती . त्यातील पुरुष तरुणाच्या अंगावर पुरेसे कपडे हि नव्हते . काहीना किळस यावी . . काहीना कणव यावी अशी वेळ होती .
काही जण एखादे नाणे देत होते ,काही जण हुसकावून लावत होते .

दुचाकी वरून निघालेल्या पण सिग्नलला थांबलेल्या दोन तरुणांना त्यांनी भिक मागितली . आता ते कचकचीत शिवी हासडणार . . हाकलणार अशी माझी सवयीची समजूत होती

पण दुचाकीच्या मागे पाण्याची बाटली घेवून बसलेल्या तरुणाने काही न बोलता . . . त्या काळ्या कभिन्न दाम्पत्य अपंग वेडसर मूर्तीकडे शांत -कोऱ्या नजरेने नजरेने पाहिले

आणि दुसऱ्या क्षणी काही कळायच्या आत . .
ती थंड मृगजळ वाटणारी पाण्याची बाटली काळ्या कभिन्न वेडसर भिकारी दाम्पत्याच्या हातात त्या तरुणाने दिली होती !

सुखद धक्का होता मला . .

सूर्य ,उन्हे -दुष्काळ कितीही धगधगला तरी माणुसकीचा पाझर आटू न देणे ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे ना ?

थोडीसी लिफ्ट . . .



दिवस धावपळीचा होता खरा . रात्री ९ च्या दरम्यान घरी परतू लागलो तर एका कोपऱ्यावर आजीबाई रिक्षा थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसल्या . त्यांच्या साध्या , अत्यंत गरीब सारख्या दिसणाऱ्या अवतारामुळे रिक्षा थांबत नव्हत्या . मी गाडी वळवून त्यांच्या पर्यंत जावू लागेपर्यंत त्या आणखी पुढे चौकात रिक्षा थांबवू पाहत होत्या . त्यांच्या जवळ गेलो . कार थांबवली .

'आजीबाई रिक्षा थांबणार नाही आता . माझ्या गाडीत चला . मी सोडतो तुम्हाला घरी .' असे मी म्हणून पाहिले .

आजीबाई लगेच बसल्या .'

पुढे पुलापाशी घर आहे माझे . तिथे जाउन अंडा बुर्जी गाडीचे सामान घेवून परत इथेच यायचे आहे . मुलगा भांडून गेला आहे . आज मलाच अंडा -बुर्जी गाडी सांभाळायला हवी ' आजी बाई बोलत्या झाल्या

त्यांच्या झोपडपट्टीत जाउन त्या किलो-दोन किलो चिरलेला कांदा ,भांडी ,तेल -तिखट वगेरे गाठोडे घेवून आल्या . कार मध्ये बसल्या .
मी बोलता राहून त्यांचा संकोच कमी केला . त्यांच्या बुर्जी गाडी जवळ कार थांबली आणि गुडघे दुखणाऱ्या सत्तरी तील आजीबाई चे गाठोडे उतरून दिले .

आजीबाई कांद्याचे गाठोडे घेवून पहिल्यांदाच कार मध्ये बसल्या असणार . . ' बाळा ,तुला २ ० रुपये देते ' असे म्हणाल्या .

मला चटकन माझी आजी आठवली .असेच लुगडे नेसून साधे राहून काही -बाही कष्ट करणारी . .

डोळ्यात पाणी आले ,म्हणालो ' आजी ,राहूद्या पैसे तुमच्याकडेच . मी एखाद दिवस येईन तुमची बुर्जी खायला '

आजीबाई गेल्या त्यांचे रहाट गाडगे चालवायला . आता १ २ वाजेपर्यंत त्या बुर्जी ची गाडी सांभाळणार . मग परत घरी कशा जाणार ? त्यांचा संघर्ष कधी संपणार ?

अनुत्तरीत प्रश्न,गाडीत चिरलेल्या कांद्याचा घमघमाट आणि माझ्या डोळ्यात पाणी उभे करून आजीबाई मार्गस्थ झाल्या

. . . मलाच नंतर माझा मार्ग कळेना .