Monday, May 27, 2013

अकल्पित गोष्टी -अनपेक्षित भीती !

अकल्पित गोष्टी -अनपेक्षित भीती !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळची वेळ होती . मी नेहमीप्रमाणे चालत होतो

समोरून दोन मुलांना बसवून एक मध्यमवयीन मनुष्य झुमकन बाइक चालवत आला . . तो मला क्रॉस करून जाणार तेवढ्यात त्याच्या तोंडावर काही वस्तू आदळणार असे त्याला वाटले ।

तो गडबडला आणि बाइक वरून मुलांसह पडता पडता वाचला . .

ती वस्तू मी आधीच पाहिली होती . काळ्याभोर रंगाचे गरीब फुलपाखरू होते ते . . मस्त रमत गमत ,न ठरलेल्या मार्गावर विहरत होते

खरेतर हा माणूस त्याच्या मार्गावर आडवा आला . . तरी फुलपाखरू घाबरले नाही . स्वताची लय बिघडू न देत ते जिकडे जायचे तिकडे निघून गेले

मी विचार करत बसलो . . अनपेक्षित समोर येणाऱ्या गोष्टीना माणूस का घाबरतो ?

फुलपाखरू म्हणजे काही दगड गोटाच आपल्या कपाळावर येउन पडत आहे ,असा भास त्या माणसाला का झाला ?

अनपेक्षित गोष्टींबद्दल कसली अनामिक भीती त्याच्या मनात दडली होती ?

अनपेक्षित गोष्टी कपाळ मोक्ष करतील कशावरून ?

अनपेक्षित गोष्टी अनपेक्षित आनंद सुद्धा देतील कदाचित ,हे कळायला हवे

पण त्यासाठी मनात दडलेल्या भीतीवर मात तर करायला हवी !

लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण '

लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण '

महाराष्ट्रात काम करणारे नितीन (भाऊ ) गडकरी अचानक भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा महाराष्ट्राचा उर साहजिकच भरून आला.मलाही त्यांचे आकर्षण होतेच (कारण ते राज्यात मंत्री असताना त्यांच्या निवास स्थानी भल्या सकाळी खिचडी खात -खात त्यांची मुलाखत घेतली होती.. . रॉयल स्टोन ' ला बहुतेक . मी टेक्सी ने आलो आहे ,हे कळताच त्यांनी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी मला सी एस टी पर्यंत सोडायला दिली होती . इतकी बारीक काळजी घेणारा हा नेता आहे ) .

ते भाजपा अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या दिल्ली निवास स्थानी भेटण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते .पण त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे डॉक्टर हे माझे मित्र आहेत.ते मला गडकरी भेटीला घेवून गेले...गडकरी राहायचे त्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून दिल्ली हिरवी आणी छान दिसते.स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी ,राज्यातील नेते...अशी गर्दी होती.सर्वांचे खाणे ,सरबराई चालू होतीच.गडकरी यांच्या २-३ राज्यातील दौरे आणी एका नेत्याच्या घरच्या लग्नाला जायची तयारी चालू होती. डॉक्टरबरोबर गडकरी यांना नंतर भेटण्याच्या दोन -तीन वेळा आल्या...एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महणून मराठी माणसाची कारकीर्द यशस्वी व्हावी हीच सदिच्छा होती त्या वेळी !

२ ० ० ९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात गरवारे महाविद्यालयात त्यांच्या मेळाव्याला अरविंद नाईक -दिलीप कांबळे मला घेवून गेले . उद्योग -सहकार -समाजकारण आणि राजकारण या सूत्रात कार्यकर्त्यांना तालुका पातळीवर कसे गुंफायचे याची विलक्षण ' थियरी ' ते सहजपणे मांडत होते .

आणि परवा ' डी एस के गप्पा ' मधील गडकरी थेट भिडणारे ,दिलखुलास होते .

पार्टीने तिकीट बदलावे लागल्याने गडकरी यांनी उमेदवारी दिलेल्या महिलेला परत बोलावून तो दुखद निरोप द्यायचा प्रसंग आला . तेव्हा ती महिला म्हणाली ,' नितीनभाऊ ,पार्टी म्हणतेय तर तसेच करा . हे तुम्ही दिलेले दहा हजार परत देते . मात्र त्यातील अडीच हजार प्रचारासाठी खर्च झाले आहेत ' ! ( अशा कार्यकर्त्यांच्या जीवावर पार्टी उभी आहे ,असे नितीन गडकरी सांगतात )

एकदा डॉ श्रीकांत जिचकार आणि गडकरी वीस वर्षापूर्वी महाराष्ट्र एक्स्प्रेस ने पुण्यात आले ,

तेव्हा गडकरींची सुटकेस घेण्याच्या सूचना जिचकारांनी त्यांच्या सहाय्यकाला दिल्या होत्या . ! ' तू कॉंग्रेस मध्ये ये .तुला आमदार करतो ' असे जिचकार म्हणाले . तेव्हा ' मी विष खाईन पण कॉंग्रेस मध्ये येणार नाही ,' असे नागपुरी उत्तर गडकरींनी दिले होते

त्याच वेळी शिवाजीनगर पुणे येथे श्रीधर माडगुळकर कॉंग्रेस च्या प्रचाराचा फलक लागला होता . त्यात 'दोन खासदार असलेल्या पक्षाने कॉंग्रेस ला काही शिकवू नये ' अशा स्वरूपाचा 'संदेश ' लिहिला होता . तो वाचून गडकरींना खूप दुक्ख झाले . त्याच पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले !

कंत्राटदार मंडळीना कसे तिकीट देता ? कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलत राहायचे का ?

या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले ,' मी सायकल रिक्षातून पक्षाचा प्रचार केलेला कार्यकर्ता आहे . आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो आहे . किमान मला तरी हा प्रश्न विचारू नका ! '

नागपुरात आम्ही चार जण एका मोटार सायकलीवर प्रचार करत फिरायचो ,तेव्हा चौथा कार्यकर्ता मागे बसून नंबरप्लेट दिसू नये म्हणून त्यावर हाथ ठेवायचा . असे दिवस होते . .

नक्षलवादी भागात गडकरी कसे मदतकार्य करतात आणि त्यांचे फोटो झोपडीत कसे लागले ले असतात ,हे त्यांनाच अधिकार्यांनी सांगितले . ' व्यवस्था जर न्याय देत नसेल ,कायदा जर न्याय देत नसेल ,तर तो फेकून द्यायला हवा ' असे त्यावर बिनदिक्कत पणे ' दबंग ' गडकरी सांगतात

एक्स्प्रेस वे झाला तेव्हा ते काम करणाऱ्या बड्या कंपन्यांच्या मालकाबरोबर १ ४ ० हून अधिक स्पीड ने गाडी चालवली जाइल ,त्यावेळी मी चहा पीत बसेन ,चहा सांडला तर याद राखा ' असे नागपुरी सावजी भाषेत मंत्री असलेले गडकरी ' क्वालिटी कंट्रोल ' बद्दल बजावतात ,तेव्हा घाम पुसण्याची पाळी इतरांची असते

' सिंगापूर चा जोईंट ' आणून चांगल्या दर्जाचा फ्लाय ओव्हर बांधणाऱ्या कंत्राटदाराने जेव्हा मंत्री नसलेल्या गड्करीना पूर्ण झालेले काम पाहण्यासाठी रात्री जाऊया . . तुम्ही येई पर्यंत मी हलणार नाही . असे सांगितले . निरुपाय झालेले गडकरी जातात ,चांगल्या कामाबद्दल त्याची पाठ थोपटतात . . तेव्हा तो दाक्षिणात्य कंत्राटदार म्हणतो ,' साब ,अच्छ काम करने के लिये ,

आपने इतनी बार मुझे गालीया दी . . और मै अच्छा काम करने लगा । उसी वक्त मैने दिसाइड कर लिया था ,कि जब तक आप पीठ पर हात रखते नही ,तब तक हटूगा नही '

कंत्राटदार आणि माजी मंत्री यात असा रुदय हेलावणारा संवाद होत असतो ,हे ऐकून आपण अवाक होतो . .

मी अनेक पूल बांधलेत ,राज आणि उद्धव यातील पूल बांधणे सगळ्यात अवघड आहे ,पण मला ते करायचे आहे ,असे बोलून ते सहजपणे पत्रकारांना बातमी पण देतात . माझ्याविरुद्ध कट रचला गेलाय . . मी त्यातून बाहेर पडेन . . मी लढणारा माणूस आहे '

हे गडकरी बोलतात ,तेव्हा लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण ' केव्हाच आपल्या मनाला भिडलेले असते !

वाढ दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ,नितीनभाऊ !

Friday, May 24, 2013

स्वप्नांचा मृत्यू…

रोज जमेल तसा मॉर्निंग वॉक घेतो. . . एस पी कॉलेज ग्राउंड वर पहाटे -सकाळी मस्त माहोल असतो. . आरोग्य महोत्सव असतो म्हणा न . उन्हाळा सुरु झाला आणि मुलांच्या परीक्षा संपल्या तेव्हा एक नवल पाहिले . . एका कोपऱ्यावर कोवळी मिसरूड फुटलेली गोड -सावळी मुले ताजी भाजी घेवून विकायला बसली होती . खूप काही घेवून उत्साहात . बरे वाटले . पण सकाळी खिशात पैसे घेवून फिरायची गरज नसल्याने भाजी त्यांच्याकडून घ्यायची राहिलीच .

पण त्यांना पाहिले . . त्यांचे काळे भोर डोळे पहिले , लगबग पाहिली कि आदित्य ची त्यांची मैत्री करून द्यायला हवी असे वाटायचे

एकदा आदित्य च लवकर उठला . . म्हणाला ' बाबा येतो मी फिरायला ' . मला बरे वाटले . खिशात पैसे घेतले . वॉक संपला तसे आदित्य ला पुढे करून त्या अश्राप मुलांकडून भरपूर खरेदी करायला लावली . आदित्य ने दहा रुपये जास्त पण दिले त्यांना . .

मग रोज मी त्यांना पाहायचो . . आदित्य ने त्यांच्या सोबत राहून ' समर जॉब ' केला पाहिजे . . असे स्वताला बजावायचो

अचानक कधी तरी ती मुले . . त्यांचे फुटपाथ वरचे भाजीचे प्रदर्शन दिसेना झाले

काळजाचा ठोकाच चुकला . .

त्यांच्या कोवळ्या धडपडीला ,उद्योजकतेला लगेच आणि पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रयत्न थांबविला होता बहुतेक . .

किती गोड मुले होती. . किती बोलावेसे वाटायचे . . कोण ,कुठली . . का रस्त्यावर भाजी विकतात . . विचारावेसे वाटायचे . . पण नाही विचारले कधी

आता ती रिकामी जागा पाहिली की काळीज गलबलून येते . .

माणसाच्या मृत्यू पेक्षा त्याच्या स्वप्नांचा मृत्यू फार भयानक असतो

त्या पोरांनी कसे सोसले असेल ?
तीन लग्नांची गोष्ट !

अलीकडेच दोन लग्नांना जाण्याचा योग आला . . त्यातील एक लग्न होते . आणि एक लग्नानिमित्त केलेला समारंभ होता . . आणि एक तिसऱ्या लग्नातील वरात होती

पहिल्या लग्नात नवरदेवाचे मित्र इतका धुडगूस घालत होते कि बस. . त्यांनी सुरुवात नवरदेव घोड्यावरून देव दर्शन करायला जातो ।तिथुन केली . त्याला नाचात -धनगड धीन्ग्यात सहभागी करण्याच्या नावाखाली ते इतके त्याच्या अंगाला भिडले होते कि फक्त बलात्कार करायचाच बाकी होता . त्रासलेला नवरदेव काहीही करू शकत नव्हता . मग हे टवाळखोर लग्नाच्या वेळी त्याला अक्षता फेकून मारत होते .विधि-मंत्र सुरु असताना शेरेबाजी करत होते . सप्तपदीच्या वेळी ' ए जोरात नको पळू ' असे ओरडत होते . . हार गळ्यात घालू न देण्यासाठी नवरदेवाला उचलण्याचा 'आयटेम ' तर होताच . . मग २ ० जण होम सुरु असताना स्टेज वरच शेरेबाजी करत एन्जॉय करत बसले . . भटजींना पण त्यांनी काही सुचू दिले नाही . . जवळ जवळ ५ ० ० जणा समोर त्यांचा हैदोस सुरु होता . . .

दुसरा अनुभव भरत देसरडा यांच्या घरातील विवाहानिमित्त त्यांनी काही मदत सामाजिक कामाला देवू केली होती . ' दीनदयाळ शेतकरी विकास प्रकल्प ' (यवतमाळ) तर्फे विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यापैकी ५ २ जणांच्या विधवाना उद्योजक बनवून स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत देण्याचा कार्यक्रम होता . माझे ज्येष्ठ मित्र विजय ठोंबरे यांनी आयोजित केला होता .

अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला . देसरडा कुटुंबातील नव दाम्पत्याने सामाजिक सामिलकी दाखवून संसाराला सुरुवात केली होती . .

त्या कार्यक्रमाच्या ठिकाणा बाहेर . . मात्र एक झोकदार वरात डी जे ,स्पिकर्स , नाच असे श्रीमंतीचे प्रदर्शन मिरवत चालली होती . . त्यांच्यापासून काही फुट अंतरावर एक सामाजिक सामिलकी ची संवेदनशील क्रांती घडत होती . . . ते त्यांच्या गावीही नव्हते !

अवाक मीच झालो . .

देव पण काय करामती आहे . .

एक वास्तव आणि एक स्वप्न . . एक आव्हान , एक प्रयत्न . . एक प्रश्न एक उत्तर . .

एकाच ठिकाणी,एकाच वेळी , दोन डोळ्यांना दाखवत असतो !
शोधता येत नसतो तो ।
.........................................

शोधता येत नसतो तो. . भेटतो . .
डायरेक्ट ।
थेट ,अकल्पित . . ध्यानी मनी नसताना . सिग्नल ला सुधा

मेगा ब्लॉक असला तरी . .

मेगा ब्लोक असला तरी त्याची ट्रेन येते धड धडत
आपल्याच रुळावरून . . आपल्याला धडकणार असे वाटत असताना
तो थांबवतो ।
आणि आपल्या ट्रेन ला ओढून नेतो . . थेट मस्त यार्डात

ड्युटी . . ऑफिस . ग़र्दि .घाम . . हळूच विसरायला लावतो
ए एम आय ,एफ एस आय ,अप्रेझल . . सारे फिझुल होवून जाते

त्याच्या डोळ्यात पाहतो आपण स्वप्ने भव्य शिश महालाची
त्याच्या हृदयात ऐकतो गाज समुद्राची

त्याचे ढग अलगद कोसळतात सरी होवून . . 'ताज ' च्या समोर 'गेट वे ' वर

डोंबिवली ऐवजी तो नेतो ,बोटीतून अलिबागला
चिंब पावसात मोबाईल रेंज नसताना

त्याचे धाडस असते भन्नाट ।
आपण फिदा होतो . . त्याच्या बेफिकिरी वर ,त्याच्या फकिरी वर

खिशात पैसे नसताना ,तो देतो गरम वाफाळता चहा आपल्या हातात
काही न बोलता चहावाला पण त्याला नीट कप स्वाधीन करतो

जसे आपण निमूट हृदय त्याला स्वाधीन केलेले असते न तसे

तो असतो एक चमत्कार . .
आपण फ्लेटफॉर्म वर असताना हळूच आपले डोळे मिटतो . .मागून येवून
आख्या मुंबईला तो सीन पाहण्यासारखा असतो

आपण लटकेच रागावतो ,खुदकन हसतो ,होतो लट्टू . .पुन्ह एकदा
पाहिलेली वाट , आलेला राग . .सारे विसरून ,विरघळून जातो . . त्याच्या खोट्या कारणात

तो असतो एक कवी कल्पना आपणच आतुर होवून केलेली

ती हाक असते आपणच आपल्याला घातलेली

आपलेच प्रेम त्याच्या रूपाने आलेले असते उफाळून
'तो ' निमित्तमात्र . . आपण व्यक्त होण्यासाठी

'तो ' निमित्तमात्र . . . आपण मुक्त होण्यासाठी !