Saturday, March 8, 2014

मानवी मनाचे महाभारत : 'आता मजा येईल ' :एक स्वगत !


------------------------------------------------------
लहानपणी म्हणजे साधारण १० वी  इयत्तेत जाण्या पूर्वी आमच्या गावी मोजक्या लोकांकडे टी व्ही होता . रंगीत  टी  व्ही एक  दोनच  होते . रविवारी महाभारत  बघायला 'भारत  बंद ' करण्याचे  दिवस  होते  ते . माहित  असलेल्या  महाभारतातील  'शिन ' उत्कंठेने  पाहिले  जायचे . खूप  गर्दी  व्हायची  त्या  टी  व्ही  भोवती !

मी  ज्यांच्याकडे रंगीत  महाभारत  पाहायला  जायचो ,त्या घरातील तरुण महाभारत एपिसोड संपला कि न चुकता  म्हणायचा ,' आता  खरी मजा येणारे ' !  म्हणजे पुढच्या  एपिसोड  मध्ये  महाभारत अजून रंगणार  आणि  अजून  पाहायला  मजा येणार . मग  आठवडा  त्या  मजेच्या  प्रतीक्षेत निघून  जायचा .
यथावकाश जमेल तेव्हढी मजा देवून महाभारत संपले .
आज  गावी गेलो कि तो टी  व्ही मालकांच्या  घरातील तरुण भेटतो कुठेतरी .
आणि  वाटते ,कि ,त्याच्या  काय - माझ्या  काय  जगण्यात  'खरी ' मजा अजून  बाकी  आहे . पण 'मजा ' असलेल्या एपिसोड  साठी दर  आठवड्याच्या 'त्या ' दिवसाकडे डोळे लावून  पाहणे  अजून  सुरूच  आहे . . .
(आज सोमवार पासून सुरु  झालेल्या आठवड्यासाठी  सर्वांनाच  शुभेच्छा ! आता  खरी  मजा येणारेय !! )

संडे कब आयेगा ?



रविवार सरला तरी त्याच्या स्मृती सोमवारी रेंगाळत राहतात ..

 जर रविवारी आपण अशा वेगळ्या गोष्टी केल्या कि ज्या आठवडाभर करता येत नाहीत ,तर तो नक्की संस्मरणीय होतो .

मला  खूप रविवार  नंतर अशी संधी  होती .  त्या साठी  शनिवारी  रात्री  ' भाग  मिल्खा    भाग ' सहकुटुंब  पाहिला . ' मटार  भात ' हि शनिवार  रात्रीची  'आपली  आवड ' असल्याने  आदित्य ने त्यावर  ' भात  मिल्खा  भात ' अशी कोटी केली  ! ( पोरगा  हुशार  आहे   )

सर्व रविवारीय वृत्तपत्रांच्या पुरवण्या  वाचून काढल्या . बाल्कनी तून दिसणाऱ्या भव्य मैदानात  रविवारी  भरणारा  साप्ताहिक ' भव्य  क्रिकेट महोत्सव'  पाहिला ! घरात मदत  केली . डोक्याला  भरपूर  तेल  लावले . . देवीच्या  घटाला लागणारी तिळांच्या फुलांची  माळ  तयार केली ..  आणी  गौरी  साठी सकाळी  चहा  केला  ! दीड महिना मला टी  व्ही पाहिला मिळाला नाही . मी हिस्टरी चनेल पाहून ती हौस पूर्ण  केली . 'घर ' या विषयावरील  सुंदर  साप्ताहिक मालिका हिस्टरी वर सुरु आहे . त्यात  काल  विनय पाठक ने वहिदा रेहमान  यांना  त्यांच्या पूर्वजांच्या घरी -गावी नेवून  स्मृतींच्या हिंदोळ्यावर नेले . . डोळ्यात अश्रू आणले .

 गोविंद निहलानींची  'तमस  ' मालिका   पाहिली . उर्मिला पवार यांचे 'आयदान ' वाचून पूर्ण केले .  आदित्य चा अभ्यास घेतला . . ( आणी भरपूर झोप घेतली . . हळीवांचे लाडू खावून ! )

थोडे  संगीत ऐकले  असते  आणी पेंटिंग -फोटोग्राफी केली  असती  तर हा रविवार सुवर्णाक्षराने लिहावा लागला  असता

 पण असा रविवार  चांगला गेला  कि तो  मला  टोचतो ,लगेच  व पु किवा  जयवंत  दळवींच्या  रविवार  वरील एका  कथेची  आठवण होते . .  त्यात असोशीने  रविवार ची वाट  पाहणाऱ्याचा रविवार  कसा  कामे  अंगावर  घेवून  संपून  जातो  ,हे प्रत्ययकारी  लिहिले  होते !  माझे अनेक  रविवार  असे  कामात उडून जातात . .

कालच्या  सारख्या अशा  रविवारीय  संगीत  सभा /वाचन  सभा /कौटुंबिक सभाच हा दिवस अविस्मरणीय  करतात . .

. . . . संडे कब आयेगा  ?