Monday, December 15, 2014

कृषी संस्कृतीचे हे 'गोल रिंगण '

निवडणुकीच्या कामा निमित्त कोठे तरी , कृषी संस्कृतीचे हे 'गोल रिंगण ' पाहतो ,तेव्हा सुखावून जातो .
शेणाच्या गोवऱ्या थापाव्या वाटतात ,चुलीवरील गरम भाकरी काढताना हात भाजून घ्यावासा वाटतो ,अंगणी सारवण घालावेसे वाटते ,जनावरांना प्रेमाने वैरण घालावीशी वाटते ,
आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत ,हळूच त्यांचे अश्रू पुसावेसे वाटतात . 

Modi and Didi ! :मोदी, दीदी (आणि प्रबोधन माध्यम ) !

Modi and Didi ! :मोदी, दीदी (आणि प्रबोधन माध्यम ) !
........................................
'नरेन्द्रभाई मोदी हे देशाचे पंतप्रधान झालेले पाहायला मला आवडेल आणि सर्वांचीच ती
इच्छा आहे ' असे लता ( दीदी ) मंगेशकर यांनी १ नोव्हेंबर २०१३ रोजी ऐन दिवाळीत पुण्यात उद्गार काढले आणि आज ते प्रत्यक्षात आले !
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमाला देशभरातील २५० पत्रकारांना निमंत्रित करणे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून प्रवेश देणे हि जबाबदारी 'प्रबोधन माध्यम ' या आमच्या news एजेन्सी वर देण्यात आली होती .
(आधीच्या पाटणा सभेत Bomb स्फोट झाल्याने पुण्यात अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला होता )२०१३ हे प्रबोधन माध्यम ' चे दशकपूर्ती वर्ष होते . या दशकातील ही आमची संस्मरणीय कामगिरी ठरली .
दीदींनी नरेंद्र मोदींना दिलेल्या सदिच्छा आणि मोदिनी त्याचा स्वीकार केला तो क्षण खास आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी . . .
स्थळ :गरवारे महाविद्यालय ,पुणे
संयोजक :दिनानाथ मंगेशकर रुग्णालय
प्रसिद्धी संयोजन :प्रबोधन माध्यम न्यूज एजेन्सी (दीपक बिडकर ,गौरी बिडकर )

पालगड हा एक किल्ला

६-७ जून रोजी पालगड या आमच्या गावी होतो . पालगड हा एक किल्ला आहे .(किल्ल्याची ऊंची: १३२८ फुट) लांब पायथ्याशी गावठाण आहे .
आम्ही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा किल्ला मुलांना दाखवला . किल्ला अगदी ५-७ गुंठ्या इतका लहान आहे . वरती पोहचताना दमछाक होते . मात्र पोचल्यावर आसपासच्या टापुचे विहंगम दृश्य दिसते . किल्ल्यावर दोन तोफा आहेत ,
खाली किल्लेमाचीवर मनुष्य वस्तीमध्ये एक तोफ आहे . आमचा पहिलीतील अविरत टणाटण चालत सर्वात आधी पोचला ,एरवी पुण्यात तो चालायचा ज्याम कंटाळा करतो ,
त्याचे नवीनच रूप हा किल्ले चढताना पाहायला मिळाले !

बोलो गंगा मैय्याकी जय !

'गंगेच यमुनेचैव
गोदावरी सरस्वती
नर्मदे सिंधू कावेरी
जलैस्मिन सन्निधिनकुरु ' :
हजारो भाविक गंगामातेच्या स्नानाने कृतकृत्य होतात . सायंकाळची गंगा आरती हे अखिल भारतीय संमेलन असते ' ,असे आमचे गुरु प्र के घाणेकर यांनी लिहिले आहे . पहिल्या पावसाची पांढरी माती वाहून सफेत गढूळ पाण्यात गंगास्नान करणे सोपे नव्हते . थंड पाण्यात स्नान केल्याने शिणवटा गेला . पोहण्याची हुक्की आली .
तिथल्या गुरुजींनी काही धार्मिक विधी ,दान करून घेतले . गंगापूजन ,पुष्पदान ,दीपदान केले साडेसातच्या गंगा आरती आधी तेथील विश्वस्त व्यवस्थेतील कर्मचारयानी रीतसर घोषणा करून आरतीच्या आधी दहा मिनिटे दान गोळा केले !
आदित्य ने अन्नदान केले . बाकी घाटावरील गरम वाफाळती मक्याची कणसे दिसतात छान पण आपल्यासारखी गोड नसतात . 'बाबरी भवन ' सारखी नावे गमतीशीर आहेत . मोटार सायकल चा वापर करून तयार केलेली विनामूल्य शव वाहिनी (लांबून ) पाहण्यासारखी ! अनेकांनी गंगाजल आणायला सांगितलेय . मी स्वतासाठी भगवे उपरणे घेतले गळ्यात .
हजारोंच्या संगतीत मोठे काकडे घेवून होणारी गंगा आरती हा रोज सायंकाळी होणारा उत्सव च !
दोन्ही हात वर करून गुरुजी गंगेचे पावित्र्य राखण्याची शपथ घ्यायला लावतात . 'हम गंगा मैय्याकी कि पवित्रता मान -सन्मान बनाये रखंगे. प्रदूषित नही होने देंगे . बोलो गंगा मैय्याकी जय !

पिपलकोटी

बद्रीनाथ ला ज्योतिर्मठ मार्गे जाताना पिपलकोटी हे छोटे पण सुरेख गाव लागते .त्याआधी शिवपुरी मध्ये हिमालयीन कॅम्प दिसतात .
देव प्रयाग ,रुद्र प्रयाग आणि कर्ण प्रयाग दिसतात . प्रयाग म्हणजे संगम . भागीरथी आणि अलकनंदा या नद्या देव प्रयाग ला दोन वेगळ्या रंगाचे पाणी घेवून मिळतात ,आणि पुढे गंगा म्हणून जातात .
पिपलकोटी खूप उंचावर आहे . इथे मुक्काम केला . थंड पाणी अंगावर घेतले आणी शिणवटा गायब झाला . या वर्षी भाविक आणी पर्यटक कमी असल्याने हॉटेल मध्ये उत्साहाने स्वागत झाले . पर्वताकडे तोंड असणारी रूम असणारे हॉटेल शोधून काढले . पहाटे उंच पर्वतावर सूर्याची किरणे पडलेली पाहिली . हरिद्वार - -देव प्रयाग येथील उष्ण वाऱ्यातून ,कठीण घाटातून आपण पिपलकोटी ला पोचतो आणी थंड हवा आपला ताबा घेते .
वाटेवर हेमकुंड साहिब ला किमान हजार किलोमीटर दुचाकी चालवत जाणारे शीख भाविक भेटतात ,तेव्हा ए सी गाडीत बसल्याची लाज आपल्याला वाटते . चालक म्हणतो 'ये सरदार अपने धर्म के प्रती बहोत होते है ,अन्य कोई हो नही सकता ' .
अजगरासारखा डिझाईन पेटर्ण असणारे उंच महाकाय वृक्ष ,पायऱ्यांची शेती ,ढासळलेला भलामोठा पर्वत आणी वाहणारी नदी ,शेतातून फिरणारी वानरे आपले स्वागत करतात .
पिपलकोटी म्हणजे अगत्य ! दूरच्या वाटेवर जाताना एक हिरवळ . . पावसाचा हलका शिडकावा देणारी

भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव

अक्राळ -विक्राळ पर्वतातून बद्रीनाथ ला गेल्यावर प्रवास संपत नाही .
पुढे चार किलोमीटर अंतरावर माना हे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव आहे . हे गाव पौराणिक -ऐतिहासिक महत्वाचे आहे . येथे सरस्वती नदीचा उगम आहे . व्यासांनी जेथे महाभारत लिहिले ती व्यास गुहा आहे .
गणेशानी व्यासांचे ऐकून महाभारत लिहून घेतली ती गणेश गुहा आहे . मुक्तीसाठी स्वर्गारोहण पर्वताकडे निघालेल्या पांडवांचा मार्ग येथून सुरु होतो .
सरस्वती नदी द्रौपदीला ओलांडता यावी म्हणून भीमाने प्रचंड शिळा आडवी पाडून केलेला भिमपुल येथे आहे . सरस्वती -अलकनंदा संगमही आहे . माना हे विणकरांचे गाव आहे . छान शाली ,टोप्या ,उबदार कपडे विणले जातात . माना गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे भारताची तिबेट दिशेची सीमा येथे संपते . या दिशेचे हे शेवटचे गाव आहे .
या गावाच्या शेवटी एक चहाचे दुकान आहे . तेथे 'हिंदुस्तान कि चाय कि आखरी दुकान ' आहे . नरेंद्र मोदी पोहोचायच्या आधी आम्ही तेथे पोहोचून चहा घेतला आणि फोटोही काढून घेतला . इतके विविधांगी महत्व असलेले गाव दुसरे कोणतेही नसावे . .

बद्रीनाथ ,बद्री नारायण !

बद्रीनाथ ,बद्री नारायण !
----------------------------------
हिमालयात सर्वत्र शंकराचा वास असताना बद्रीनाथ मात्र विष्णूचे स्थान आहे . बौद्ध काळात थोलीन्गमठ (तिबेट ) मध्ये बद्रीनाथ होते ,मात्र बौद्ध प्रभाव वाढल्याने ते बद्रीनाथ येथे आले असे मानतात . बद्रीनाथ ला जाण्याचा मार्ग अजूनही खडतर आहे . डोंगर , दरडी कोसळून भीती वाटेल अशा कच्च्या रस्त्याने ,अक्राळ -विक्राळ दगडी खिंडींतून ,नदीतून जावे लागते . बद्रीनाथ ची उंची ३५८३ मीटर (१० हजार फुट )आहे
वाटेत बर्फ लागतो . बद्रीनाथ ला आम्ही पोचलो तेव्हा खूप कमी गर्दी होती . जेमतेम ३० भाविक होतो . एरवी पहाटे ३ पासून दर्शनाच्या रांगा लागतात . सभोवताली बर्फाची शिखरे आहेत . रोरावत धावणारी सरस्वती ,अलकनंदा नदी बद्रिनाथाच्या मंदिराच्या पायऱ्या जवळून वाहते .
नदी आणि मंदिराच्या २० फुटाच्या अंतरात तप्तकुंड हे गरम पाण्याचे कुंड आहे . नदीच्या थंड पाण्यात हात घालावासा वाटत नाही ,आणि तप्त कुंडच्या गरम पाण्यात पण सहजासहजी हात घालावासा वाटत नाही ,असा नैसर्गिक चमत्कार आहे . सकाळी स्नान केले तर तप्त कुंडाचे गरम पाणी चटका देत नाही . गरम कुंडात उतरता येते . मंदिराला अहल्याबाई होळकर यांनी अर्पण केलेला सोन्याचा कळस आहे ! हिंदू -बौधः ,जैन सर्वाना हि बद्रीनाथाची मूर्ती आपली वाटते .
आम्ही २२ जून ला दुपारी ३ वाजता दर्शन घेतले . मुक्काम केला आणि पुन्हा सकाळी दर्शन घेतले . दोन्ही वेळा तप्त कुंडात स्नान केले . एक -दोन दिवसांचा प्रवास निर्विघ्न पार पडला कि आपण बद्रीनाथ मध्ये येतो . केदारनाथ ,अमरनाथ प्रमाणे हे दर्शन पण दुर्लभ झाले आहे .
मी पुण्याहून खास सोवळे सोबत घेतले होते . ते नेसून भगवे उपरणे अंगावर घेवून दर्शन घेतले . महाराष्ट्रीय पद्धतीचे जांभळे सोवळे नेसणारा मी एकमेव भाविक होतो . थोडी कलरफुल गम्मत !
येथे बद्रीनाथाची नाणी ,पितळी वस्तू ,उपरणी यांची खरेदी झाली .
बद्रीनाथला पर्वतातून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्या पासून वाचवायला पाट बंधारे खात्याने खास व्यवस्था केली आहे .
अनेक शास्त्री येथे पूजा ,तर्पण करायला असतात . महारष्ट्रातील बाभुळकर शास्त्री पण आहेत . पितृतीर्थ येथे पूर्वजांचे एकदा श्राद्धः केले कि सात पिढ्या ना पोचते
पांडवांशी संबंधित अनेक ठिकाणे जवळपास आहेत .व्यासानी महाभारत लिहिली ती गुहा इथपासून पांडवांचे स्वर्गारोहण ,,सरस्वती नदी याच परिसरात आहे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे माना गाव येथून चार किलोमीटर अंतरावर आहे . ऐतिहासिक सरस्वती नदीचा उगम तेथे आहे . त्याबद्दलचा अल्बम आणि माहिती स्वतंत्र लिहित आहे

ज्योतिर्मठ

ज्योतिर्मठ
---------------
ज्योतिर्मठ हे अतिशय पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे . हे ठिकाण म्हणजे बद्रीनाथाची हिवाळी गादी आहे . आदि शंकराचार्यांनी येथे तुतीच्या झाडाखाली उपासना केली आणि मठाची स्थापना केली . येथे त्यांना दिव्य ज्योती दिसली म्हणून या ठिकाणाला ज्योतिर्मठ म्हणतात . त्याचा अपभ्रंश होवून आता जोशीमठ म्हणतात .
अडीच हजार वर्षापूर्वीचा आणि ७० फुट घेर असलेला तुतीचा अमर वृक्ष पाहणे हे अतिशय पवित्र आणि रोमांचक आश्चर्य आहे . येथे बसून शंकराचार्यांनी प्रसिद्ध अम्बा स्तोत्र लिहिले . इतका प्राचीन आणि मोठा तुतीचा वृक्ष जगात दुसरा नाही . As a Hindu and as a Botany student I feel very blessed seeing such a old and holy tree on earth at Jyotirmath
जवळच असलेल्या शंकराचार्यांच्या मठात मी एकदा दुपारी सहकुटुंब गेलो . आणि एकटाच सकाळी आरतीला गेलो . अतिशय शांत वातावरणात सकाळची आरती होते . त्या दिवशी मठाबाहेरचा एकमेव मी आरतीला उपस्थित होतो . याच गावात नृशिंह मंदिर ,वासुदेव मंदिर ,नवदुर्गा मंदिर आणि अष्टभुजा गणेश मंदिर आहेत . काळ्या पाषाणातील या मूर्ती अतिशय सुंदर घडवलेल्या आहेत .
ज्योतिर्मठ च्या डोक्यावर औली हे पर्यटन स्थळ आणि स्कीईंग डेष्टीनेशन आहे . 

साइन ते साइन ! (एक दिवस असाही )

साइन ते साइन ! (एक दिवस असाही )
-----------------------------
परवा 'मातोश्री ' वरून आलो . रात्री उशीर झाला कामे संपायला . काल सकाळी ' ओटोमोटिव्ह रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया ' मध्ये ऑफ हायवे वाहनांविषयी राष्ट्रीय चर्चासत्र होते . 'माध्यम संयोजन ' आमच्या 'प्रबोधन माध्यम ' कडे होते . वेताळ टेकडी वरील या संस्थेत जाणे आनंददायक असते . तरी सक्काळी सक्काळी जाण्याचा कंटाळा होता. भारतातील वाहनांचे प्रमाणीकरण येथे होते . नवीन वाहन कंपन्यांनी बाजारात आणण्यापूर्वी चाचणी घेण्याची सरकारी यंत्रणा येथे आहे .
' सोसायटी ऑफ ओटोमोटिव्ह इंजिनियर्स ' (एस ए ई ) हि संघटना अशी चर्चासत्रे आयोजित करते . ही खूप कष्टाळू ,कल्पक आणि उत्साही तरुण मंडळी आहेत . (त्यातील कमल व्होरा हे अधिकारी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना घेवून अनेक सामाजिक उपक्रम करीत असतात )
चर्चा सत्र सुरु होताना आता अर्धा दिवस वाहने ,इंधन ,अभियांत्रिकी अशी तांत्रिक बरसात होणार असे वाटून मनाची तयारी करीत होतो
अचानक सुरुवातीला राष्ट्रगीताची घोषणा झाली .
उभे राहून पाहतो ,तर मोठ्या स्क्रीन वर मूक बधिर विद्यार्थ्यावर चित्रित केलेले राष्ट्रगीत सुरु झाले . मोठ्या शाळेच्या आवारात कृष्ण -धवल रंगावर चित्रित झालेली उत्साही मूक -बधिर मुले साईन लेन्ग्वेज मध्ये राष्ट्गीत हातवारे,मुकाभिनय यातून साकार करतात अशी हि फिल्म अगदी अफलातून आहे
ती जेव्हा लागते ,तेव्हा हमखास माझे डोळे ओले होतात . मुद्रा ग्रुप ,बॉबी पवार ,अमित शर्मा यांच्या टीम ने केलेली हि फिल्म 'देशभक्ती कि कोई भाषा नही होती ' या वाक्याने संपते !
जाहिरात विषयक सेमिनार मध्ये एकदा खुद्द प्रल्हाद कक्कर ने हि फिल्म दाखवली होती .
तर ,राष्ट्रगीत संपले ,डोळे पुसले . .
दिवसभर कामे संपवून सायंकाळी एस पी कॉलेज मैदानावर चालायला गेलो . तिथे मूक बधिर मुलांची शाळा आहे . येथील मुलांची जाता येता गाठ पडते . काही माजी विद्यार्थी शाळेच्या भिंतीवर राष्ट्रपुरुषांच्या जयंतीदिनी मोठाली चित्रे रेखाटतात
तर हि शाळा सुटली होती . आणि एक मुलगा रडत होता . त्याला जवळ घेवून साइन भाषेत ,खाणाखुणा करत काय झाले ' विचारले ,एका मुलाने त्याला खोडी करताना पाडले होते .
मी त्याला जवळ घेतले आणि शांत केले . चिखलाने भरलेल्या त्याच्या हातावर दुसऱ्या मूक मुलाने पाणी ओतून स्वछ केला
जमेल तेव्हढी साइन भाषा ,खाणाखुणा यातून संवाद साधला
तो दिवस 'साईन लेन्ग्वेज' च्या आगळ्या वेगळ्या अनुभूतीने सुरु झाला ,आणि तसाच संपला
'अभिव्यक्ती कि कोई भाषा नही होती !
(और मानवता कि कोई सीमा नही होती )

तमाच्या तळाशी दिवे लागले !:

तमाच्या तळाशी दिवे लागले !:
------------------------------
आषाढ अमावस्या (दिव्यांची आवस ) दीप पूजन करून साजरी केली जाते आणि श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते . ' आषाढ अमावस्येचे दीप पूजन हे विस्मरणात जाऊ लागले आहे ,त्याऐवजी 'गटारी अमावस्या ' अशी या आषाढी अमावस्येची बदनामी झाली आहे . 'प्रबोधन माध्यम ' या आमच्या संस्थेतर्फे नवी पेठ विठ्ठल मंदिर (पुणे )येथे सामुहिक दीप पूजन आयोजित केले होते . गटारी अमावस्या साजरी न करता व्यसन मुक्तीचा संदेश देण्यात आला . या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते .आपल्या पारंपारिक सणांचा कालोचित आणि प्रबोधनात्मक अर्थ शोधण्याचा एक प्रयत्न

दुख्खांचा डोंगर कोसळतो तेव्हा

माळीण दुर्घटना झाली तेव्हा महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस ' च्या रुग्णवाहिका तातडीने पोचल्या होत्या . दुसऱ्या दिवशी या सेवेच्या , दुसऱ्या दिवशीच्या तुकडीबरोबर अधिकाऱ्यांसमवेत मी माळीण ला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता निघालो . दुर्घटनेच्या सकाळी माळीण गावात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (डायल १०८ ) च्या रुग्णवाहिकेतून पोचलो . पहाटे ३ वाजता मी घर सोडले तेव्हा तिथे पोहोचू याची खात्री होती . अत्यंत खडतर प्रवास ,पाउस ,पोलिसांनी अडवलेले रस्ते असा माहोल होता . काही प्रवास पोलिसांच्या वाहनातून केला . नंतर ३ किलोमीटर चालत माळीण गाठले . तिथे डोंगर कोसळलाय असे वाटत नव्हते . माती वाहून आली आहे असे वाटत होते . डायल १०८ च्या रुग्णवाहिकांचे अव्याहत काम चालू होते . हि विनामुल्य सेवा शासनातर्फे बी व्ही जी इंडिया हि पुण्यातील कंपनी राज्यभर देते . २६ जानेवारीला उद्घाटन झाल्यांनतर इतकी मोठी दुर्घटना प्रसंगी मदतकार्य करण्याची हि पहिलीच वेळ १०८ वर आली .
सकाळी साडेसात ला दुर्घटना घडल्यावर १०८ ला अकरा वाजता दूरध्वनी आला . अर्ध्या तासात सुसज्ज रुग्णवाहिका तिथे पोचल्या . सायंकाळी त्यांनी प्रमिला लेंभे ,रुद्र लेंभे या मायलेकांना वाचवले . रुग्णालयात हलवले आणि नंतर जखमी आणि मृतदेह हलविण्याचे काम अव्याहत सुरु आहे .
आम्ही बीव्हीजी चे उपाध्यक्ष उमेश माने यांच्यासमवेत माळीण ,आडिवरे ,मंचर ,घोडेगाव येथील रुग्णवाहिका टीम चे पायलट ,डॉक्टर मंडळींची विचारपूस केली . रात्रभर न जेवलेल्या टीम ला जेवू घातले . व्यवस्था लावल्या आणि ताज्या दमाच्या तुकड्या बोलावल्या . पहिल्या दिवशी २८ रुग्णवाहिकांचा ताफा चार ठिकाणी तैनात होता . ६ जखमींना उपचारार्थ हलविण्यात आले . ७२ हून अधिक मृतदेह हलविण्यात आले .
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (एम ई एम एस ') चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ ज्ञानेश्वर शेळके ,डॉ प्रवीण साधले राज्य सरकारच्या आरोग्य खात्याबरोबर समन्वय साधून मदत कार्यातील व्यवस्था लावत होते . तर बी व्ही जी इंडिया चे अध्यक्ष एच आर गायकवाड उपयुक्त सूचना देत होते
महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या एका महत्वाच्या मदत कार्यात कामाची,कर्तव्य बजाविण्याची संधी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (डायल १०८ ) आणि ओघाने मला ,माझ्या back office ला म्हंजे 'प्रबोधन माध्यम ' ला मिळाली . . दुर्दैव इतकेच कि जीव वाचविण्याची फार सवलत निसर्गाने माणसाला ठेवली नव्हती .

माझी ' प्रवक्ते गिरी ' ! (कोणत्याही दिवाळी अंकात प्रसिद्ध न झालेला माझा लेख

माझी ' प्रवक्ते गिरी ' ! (कोणत्याही दिवाळी अंकात प्रसिद्ध न झालेला माझा लेख 
----------------------
ध्यानी मनी नसताना मी एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता झालो .
आणखी तिसऱ्या common मित्रामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर , माझे सासरे हे कधी मधी भेटत असायचे . एकदा ते पुण्यातील आय बी एन लोकमत वाहिनीवर लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या सासऱ्या समवेत गेले होते . मुलाखतीनंतर गप्पात बिड्करांचे सासरे आणि जानकर मित्र असून दीपक बिडकर यांना तुम्ही अजून कसे भेटला नाही ? असा काहीसा प्रश्न आय बी एन च्या उत्साही पत्रकार प्राची कुलकर्णी यांनी जानकर यांना विचारला . . आणि जानकर यांनी ते मनात ठेवून पुढे माझी भेट घेतली . . पुन्हा ते जागावाटपाच्या तिढ्यात अडकल्यावर विषय बाजूला पडला . मग भेट झाली आणि पहिल्याच भेटीत आमचे सूर जुळले
अरुण निगवेकर ,डॉ अमोल देवळेकर ,सुहास यादव ,अमित कुलकर्णी यांनी आवर्जून मला सांगितले की प्रवक्ते पदाची जबाबदारी मिळत असेल तर घ्या . अद्वैत मेहता यांची सूचना अशी होती की लगेच नको ,निवडणुकीनंतर हि जबाबदारी घ्या . काँग्रेस प्रवक्ते डॉ सतीश देसाई यांना माझी नियुक्ती कळाल्यावर लगेच फोन करून शुभेच्छा दिल्या . ( अंकुश काकडे ,डॉ देसाई ,आणि मी असे तीन प्रवक्ते एक किलोमीटर परिसरात राहतो . . हा एक योगायोग ).आमचे आदरणीय सन्मित्र डॉ विश्वंभर चौधरी यांनी 'युक्तीची एक गोष्ट ' सांगितली -वाहिनीवर आपली 'turn ' येई पर्यंत खूप वेळ जातो ,एखादे जाडजूड पुस्तक सोबत ठेवा '.
'. सकाळ ' चे रोव्व्हिंग एडिटर ' संजय आवटे यांनी मुंबई साम स्टुडियो मधील भेटीत हा पक्ष तुम्ही निवडलात हे चांगले झाले ' असे सांगितले . ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनीही माझी भूमिका फोन वरून समजावून घेतली .राजकीय नव्हे तर सामाजिक अभिसरणाची माझी भूमिका आहे हे त्यांना सांगितले . अजय गोरड हे पत्रकार मित्र माहिती देण्यास सतत online उपलब्ध होते
राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी शनिवार वाडा (डीडी न्यूज ),मासाळवाडी (headlines today with Editor Rahul Kanval ), पुणे स्टुडियो (मी मराठी ,निखिल वागळे ,जयदेव गायकवाड यांच्यासमवेत ) आणि साम टीव्ही मुंबई studio (प्रकाश अकोलकर ,समीरण वाळवेकर ) यांच्यासमवेत सहभागी झालो . .वृत्तपत्रांना आवश्यक माहिती पुरवत राहिलो . इंग्रजी वृत्तपत्रांच्या qustionaire ला उत्तरे देत राहिलो
पहिल्या कार्यक्रमात शनिवार वाड्यावर DD News च्या debate मध्ये अंकुश काकडे ,गोपाल तिवारी ,उज्वल केसकर ,बाळा शेडगे ,श्याम देशपांडे या पुण्यातील दिग्गजांबरोबर उभा राहिलो आणि उत्तम हिंदीत बोललो . माझे पत्रकार मित्र दिगंबर दराडे यांनी मला तिथे बोलावले आणि रोहन गवळी या आणखी एका मित्राने दिल्लीच्या वरिष्ठांशी ओळख करून दिल्यावर मी हिंदीत बोललो आणि मला चर्चेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली . (मला इतकी सुरुवात पुरेशी असते 
Headlines Today या दुसऱ्या राष्ट्रीय वाहिनीने मला बारामती मतदार संघातील मासाळवाडी येथे चर्चेला बोलावले .पंकज खेळकर यांनी बारामती ,जानकर ,रासप हे सगळे दिल्लीतील वरिष्ठांना सांगितल्यावर माझे नाव नक्की झाले . तिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे समर्थक पक्षाचा कोणी माणूस टी व्ही वर बोलायला आलाय ,म्हणून खूपच खुश झाले होते . 'घाबरू नका ,जोरात बोला ' असा प्रेमाचा सल्ला देत होते . त्या सर्वाना मी काय बोलतो हे कळावे म्हणून ऐनवेळी इंग्रजी ऐवजी हिंदीत बोललो . मासाळवाडी वर कसा दबाव आणला गेला हे सांगितल्यावर आमच्या पक्षाच्या समर्थकांनी चक्क पाठ थोपटली
'मी मराठी ' वाहिनीवर मी बोलावे यासाठी मुंबईतून वाहिनीच्या वरिष्ठांनी सांगितले . तुळशीदास भोईटे ,रवींद्र आंबेकर यांना मी कधी भेटलो नाही . पण त्यांनी माझे नाव लगेच 'ओके ' केले . पुणे स्टुडियो मध्ये राष्ट्रवादी आमदार जयदेव गायकवाड माझ्या शेजारी बसून चर्चेत सहभागी झाले . निखिल वागळे यांच्यासारख्या 'star ' पत्रकाराने आपल्याला प्रश्न विचारावेत ,आपल्याला गुदगुल्या व्हाव्यात आणि संपर्क तुटल्याने ते आपल्याशी बोलताहेत हे न कळल्याने माझ्या उत्तराला वागळे साहेब मुकले ! पुणे studio मधील राजू निगडे यांना त्याची खूप हळहळ वाटली
निवडणूक निकाल विश्लेषणाच्या साठी 'साम मराठी ' ने बेलापूर (मुंबई ) स्टुडियो मध्ये या असे दोन दिवस आधीच सांगितले होते . मंगेश चिवटे ,विनोद राउत यानाही कधी भेटलेलो नाही . पण त्यांचा प्रेमळ निरोप मिळाला . तेथे धावत पळत गेलो . संजय आवटे यांचे ओघवते विश्लेषण चालू होते . ते झाले लगेच समीरण वाळवेकर यांनी मला आणि प्रकाश अकोलकर यांना चर्चेत सहभागी करून घेतले . महायुतीची कामगिरी कशी होईल ,मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला राहील ,पृथ्वीराज चव्हाण यांचा आश्वासक विजय या तीन मुद्द्यांवर मला बोलता आले . प्रकाश अकोलकर यांचा अभ्यास आणि साधेपणा भावून गेला . तिथे चहा ,नाश्ता ,जेवण अशी सगळी जय्यत तयारी होति. !
आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी यातील बहुतेक सर्व भाग पाहून समाधान व्यक्त केले . आमच्या पक्षाचे आधीचे प्रवक्ते मोहन अडसूळ यांचे दहा दिवसापूर्वीच अपघातात निधन झाले होते , स्वत :जानकर साहेब आजारी असल्याने मिडिया शी बोलू शकत नव्हते ,अशा वेळी सगळे आपले आपणच समजून ,उमजून बोलणे ही मोठीच जबाबदारी ठरली
राहुल कुल आमचा एक उमेदवार निवडून आला याचा आनंद ,आणि आठवले ,शेट्टी यांचा एकही आला नाही याचे दुक्ख ,मेटे पराभूत झाले याचे दुक्ख आणि त्यांचा एक उमेदवार भारती लव्हेकर जिंकल्या याचा आनंद
अशा सुख -दुख्खाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलो .
'मिडिया ची जिम्मेदारी ' तुम्हाला देतो असे २५ दिवसापूर्वी जानकर साहेबांनी अगदी विश्वासाने सांगितले होते . नंतर त्यांनी आमच्या सासरयाना सांगितले कि 'तुम्ही आम्हाला हिरा दिलाय ' यातच आपल्या धावपळीचे समाधान होते
' जानकर -बिडकर ' या महायुतीमधील 'डील 'काय ? package काय ? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे ,पण कोणी मला विचारले नाही .,तरी लोकशाहीतील पारदर्शकता या महान मूल्याला धरून मला सांगणे भाग आहे की जानकर यांनी काही रक्कम मला सुरुवातीला देवू केली
त्यातील प्रवासखर्चाइतकी रक्कम मी स्वीकारली
हा प्रवास अर्थातच एस टी मधून केला ,आणि एस टी खर्चाला पुरेल इतकीच रक्कम मी त्यांच्याकडून घेतली . .
जानकर यांच्यासारखा साधा ,प्रामाणिक ,कष्टाळू ,गाडीतच जेवण -झोप घेणारा, अविवाहित फकीर माणूस नेता म्हणून आपल्याला मिळतो . 'ऐसा नेता मिळे आम्हाला ,मग काय उणे असे ' असे मला मनापासून वाटले . राज्यभर विखुरलेले पक्षाचे समर्थक तुमच्या प्रवक्तेगिरीला दाद देतात ,त्यांच्या असेल त्या वाहनातून लिफ्ट देतात ,,नंबर शोधून आपल्या whats ap वर आणखी कोणाच्या तरी मोबाईल मधून त्याचे फोटो ,व्ही डी ओ पाठवतात ,त्यांच्या झोपडीत नेउन प्रेमाने चहा पाजतात ,जानकर आणि रासप चे नाव सांगितल्यावर आनंदाने त्यांचे डोळे लकाकतात
आणि 'घाबरू नका ,बोलत राहा ' म्हणतात ,तेव्हा....
....खिशात हात घालून पैसे मोजायची गरजच राहत नाही !
कार्यकर्त्यानो सलाम ! ( 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' )
---------------------------------
राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा निवडणुकीत लढलेले -जिंकलेले -थोडक्या मतांसाठी हरलेले अशा सर्व ५ उमेदवारांचा सत्कार समारंभ पुण्यात १४ नोव्हेंबर रोजी १ वाजता होत आहे . वर्धमान लॉन्स ,गंगाधाम चौक ,मार्केट यार्ड जवळ ,पुणे येथे होत आहे .
या तयारीसाठी विभागवार मेळावे होत आहेत . आज बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला . मी प्रवक्ता झाल्यानंतर प्रथमच पक्षाच्या मेळाव्यात बोललो . निवडणूक प्रचारादरम्यान प्रवास करताना अपघाती मृत्यू झालेल्या प्रवक्ते मोहन अडसूळ यांना आधी श्रद्धांजली अर्पण केली
त्याआधी १७ ,१३ वर्षे महादेव जानकर यांच्यासोबत खडतर कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचे 'दर्शन ' घेता आले . बोलता आले ,ऐकता आले . . खूप बरे वाटले . कोणी महादेव जानकर कसे कष्ट उपसत एस टी stand वर झोपत ,मिळेल ते खाऊन फिरत ,स्वताचा संसार करायचा नाही ,समाजाच्या हिताला वाहून घ्यायचे हि प्रतिज्ञा करून ,पक्ष स्थापनेनंतर ११ वर्षांनी 'शासन कर्ती जमात ','शासन कर्ता समाज ' ,'शासन कर्ता पक्ष ' या पातळीवर पोचले . धनगर समाज आरक्षण आणि सत्ता यातून प्रगतीपथावर गेला पाहिजे पण अंतिम ध्येय्य काय तर 'सत्य शोधन -समाज प्रबोधन -राष्ट्र संघटन ' हा व्यापक विचार बळकट केला .
खस्ता खात पक्ष उभारणारे अनेक पायाचे दगड देवासारखे भेटले . दिसायला सगळे सावळे विठ्ठल.
. दादासाहेब केसकर तर शेतीपूरक व्यवसायातून येणारी कमाई फक्त पक्षाच्या वाढीसाठी वाहत आले . महानवर ,संपतराव टकले ,पुंडलीक्मामा काळे ,कोळसे -पाटील ,बजरंग खटके . . नावे घ्यावीत तितकी कमी .
अनेकांना जानकर साहेबाना मंत्रिपद मिळाले तर तो समाजाच्या सर्वोच्च सन्मानाचा क्षण वाटत आहे . 'आम्ही ,जानकर ,,दिलीप तुपे ,बजरंग खटके सतत निवडणुका लढायचो ,आणि सतत पराभूत व्हायचो ,पराभव नवीन नव्हता . पण हार कधीच मानली नाही ' असे खटके सांगत होते
अनेकांना पक्षाचा १४ वर्षे वनवास संपला ,जानकर यांच्यासारख्या त्यागी माणसाचा वनवास संपला असे वाटत होते आणि ते भावनांना वाट करून देत होते .
धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि एका मागास राहिलेल्या समाजाला लोकशाही मार्गाच्या प्रगतीची कवाडे खुली होतील ,त्यात भाजपा मदत करेल असे तर सर्वाना वाटत होते
नवाच असलेल्या आणि तथाकथित उच्च वर्णीय असलेल्या म्या पामर प्रवक्त्याने काय बोलावे अशा प्रसंगी ?
' संघर्ष संपलेला नाही मात्र रचनेला सुरुवात करायला हवी . शासन कर्ती जमात -समाज -पक्ष म्हणून आपण हक्क जरूर मागितले पाहिजेत पण नव्या जबाबदाऱ्याना सामोरे गेले पाहिजे . नवी कौशल्ये ,नव्या व्यवस्था -संरचना आत्मसात करून नव्या व्यापक उद्दिष्टांकडे धाव घेतली पाहिजे ' असे सांगितले .
सर्व बांधवाना बहुदा ते आवडले असावे . कारण मेळावा संपल्यावर १५ मिनिटे माझ्याबरोबर अनेक जणांचे ' फोटो सेशन ' चालले !
मी प्रवक्ता झालो तेव्हा शनिवार वाड्यावर dd news राष्ट्रीय वाहिनीवर पुण्यातील सर्व पक्षाच्या प्रवक्त्या समवेत निवडणूक विषयक 'जनवाणी ' कार्यक्रमात सहभागी झालो होतो . त्याला मी लोकशाही शाळेचा 'पहिला दिवस ' संबोधले होते
आज राष्ट्रीय समाज पक्ष मेळाव्यात अनुभवलेला दिवस हा 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' माझ्यासाठी खूप शिकवून जाणारा ,ज्याला तळागाळातील आपण म्हणतो अशा जनता -जनार्दना समवेत सत्कारणी लागलेला . .
जय हो !
एक पोस्ट चिमणराव कदम यांच्यासाठी . .
--------------------------------
चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षाला साजेसा अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्वांचे पर्व संपले . अर्ध चंद्रकोर लावून ,पांढरे धोप कपडे घालून सूर्याजीराव तथा चिमणराव कदम बाहेर पडले कि त्यांच्या तेज नजरेच्या आणि वाणीच्या पट्ट्यात शक्यतो आपण येवू नये अशी काळजी घ्यावी लागायची . फलटण मध्ये ' कार्यकर्ते कमी आणि विविध पक्षीय नेते जास्त ' अशी अवस्था . त्या अवस्थेतून त्यांनी विधानसभेवर निवडून येत सभागृह गाजवले . 1980 ते १९९५ पर्यंत हे वादळ राजकारणात घोंघावत होते . (एकदा सातारी राजकारण्यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढण्यासाठी थेट इंदिराजी च्या समोर दिल्लीत उभे केले आणि कदम यांनी त्यांना विनम्र नकार दिला तो यशवंतराव यांच्या आदरापोटी ! अशी आठवण आता कॉंग्रेस कार्यकर्ते काढत असल्याचे परवा बाबुराव शिंदे यांनी whats ap सांगितले . )
कृष्णा खोऱ्याचे पाणी पळवणारे नेते त्यांच्या शाब्दिक असुडांचे बळी ठरत . बारामतीचे शरद पवार आणि फलटणचे चिमणराव कदम यांचा लढा भिन्न व्यक्तिमत्व ,भिन्न विचारसरणी चा होताच पण बांधावरचा देखील होता . कृष्णा खोऱ्याच्या आणि करारांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ब्रिटीश लायब्ररीत कसे संदर्भ मिळवले हे चिमणराव रंगवून सांगत . टाटा इश्टेट गाडीत बसून -झोपून ते फलटण -मुंबई ,फलटण -पुणे ,फलटण -नागपूर असा प्रवास करायचे
अर्थात अशी अभ्यास करायची कॉंग्रेस ला सवय नव्हतीच . त्यामुळेच ते मुलुखमैदानी आणि मुलुखावेगळे ठरत . २००४ साली सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली . शिरीष चिटणीस आणि श्रीकांत कात्रे या मित्रांनी माझी,मी पुण्याला स्थायिक असताना देखील आणि चिमण रावांची मोट बांधली ,मला त्यांचे निवडणूक प्रसिद्धीप्रमुख केले आणि मुलुखमैदानी तोफेच्या तोंडी दिले !
laptop ,mobile ,digital कॅमेरा ,email यातील काहीच त्या परिसरात नव्हते त्यावेळी (म्हणजे दहा वर्षापूर्वी ) लिहिलेले वृत्तांत पेपरच्या कार्यालयात पोचणे हे रोजचे दिव्य होते ,
आपला प्रसिद्धीप्रमुख ,माध्यम सल्लागार म्हणजे काय हे सुरुवातीला चार दिवस त्यांच्या पचनी पडले नाही . ' तुम्ही माझी भाषणे लिहून पेपरला पाठवणार म्हणजे 'टपाल्या ' सारखे काम करणार ' असे ते खास शैलीत हिणवत ! त्यांची जहरी टीका ऐकून माणसे आत्महत्या कशी करीत नसत किवा चिमण रावांची हत्या कशी करत नसत याचे आश्चर्य मला वाटे .
पण ,नंतर एकाच गाडीत रोज आम्ही बरोबर राहून काम केल्यावर त्यांच्या ध्यानी 'माध्यम सल्लागार ' हा प्रकार आला . आणि मुलुखमैदानी भाषणे झाल्यावर गाडीत बसल्यावर मृदू आवाजात ते मला भाषण कसे झाले ,याचा 'feedback ' घेत . एकाच डब्यातील भाजी -पोळी आम्ही दुपारी कोणत्यातरी झाडाच्या सावलीत खात असू . अतिशय आरोग्यकारक भाजी ,पोळी चा डबा असे तो . दिवसभर वणवण फिरताना घसा खराब होऊ नये म्हणून पाण्याऐवजी कॉफी पीत असत ते .
सर्व प्रचार यंत्रणा एक हाती सांभाळली त्यांनी ! स्वतःच सकाळी ११ पर्यंत सर्वांना हाकून ते नियोजन करत आणि मग गाड्या प्रचाराला निघत .
काँग्रेस चे बंडखोर उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते ,लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी होती . चिमणराव कदम यांची वाट नेहमीप्रमाणे कठीण होती . त्यात निवडणूक काळात उन्हाळा आणि दुष्काळ होता . चारा छावण्या ठीक ठिकाणी पडल्या होत्या . आपली जनावरे पाणी असलेल्या पावण्याकडे खुद्द चिमणरावांनी पण धाडून दिली होती . 'यशवंत परंपरा ' चालवणे आणि लोकसभेत भांडून हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी सातारा दुष्काळी भागाला (दहिवडी -खटाव -माण -फलटण -खंडाळा ) मिळवून देणे हा त्यांचा नारा होता .
बुडत्या काँग्रेस मधून तेव्हा उंदरासारखे नेते बाहेर पळत होते ,अशा वेळी ' मी उंदीर नाही ,वाघ आहे , वेळप्रसंगी कॉंग्रेस चे बुडणारे अख्खे जहाज खेचायची ताकद माझ्या अंगात आहे ,असे ते डोळे फिरवून म्हणत ! आणि रोमांच उभे करीत . अगदी जिगरबाज माणूस . काँग्रेस च्या पचनी न पडलेला आणि जिभेच्या पट्ट्याने सर्वांना घायाळ करीत स्वतःच घायाळ झालेला .
चिमणरावांच्या पत्नी मात्र चिमणराव यांच्या भाषणाच्या बातम्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारख्या लिहा असे म्हणत ! कदम यांचे उजवे हात असलेले सहकारी अच्युतराव खलाटे मात्र चिमण राव कदम यांच्या उलट स्वभावाचे . माणसे जोडणारे आणि मुलायम बोलणारे . त्यांनी मात्र २००४ निवडणूक संपली तरी संपर्क ठेवला . ही राजकारणातील जुनी पिढी . मागे पडली ती पडलीच .
आता सातारा वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या नेत्यांमुळे ओळखला जातो
मात्र ,त्यातील एकही जण 'यशवंत परंपरा ' चालविण्यासाठी मी निवडणूक लढवतोय असे म्हणत नाही . सभ्यतेच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण एव्हढाच काय तो नियमाला अपवाद . कॉंग्रेसचे , साताऱ्याचे, यशवंतराव चव्हाण यांचे आणि चिमणराव कदम यांचे दुर्दैव हेच !
-------------------------
(सोबत :२००४ च्या प्रचारात चिमणराव कदम यांचा माध्यम सल्लागार या नात्याने मी लिहिलेल्या काही बातम्या -मुलाखती . आणि चिमणराव कदम यांच्या प्रचारात सहभागी झालेला -हातात नोटबुक घेवून मुद्दे टिपणारा मी ! )
------------------------------------------