Thursday, January 31, 2013

घटस्थापना झाली ...नवरात्र झाले ..आज विजयादशमी !

 मला आठवते माझ्या आजोळी  जावली  तालुक्यातील खर्शी जवळ हात्गेघर येथे  लहानपणी  या घटात  पेरलेले धान्य नऊ  दिवसात उगवल्यावर ..दसर्याला त्याचे तुरे आम्ही मुले आणि तरुण मंडळी डोक्यावरील पांढर्या गांधी टोपीत खोचून मिरवत असू ! परवा माझ्या घटस्थापना  पोस्ट  वर कॉमेंट  करताना ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटणकर म्हणाले ' हा कृषी संस्कृतीचा सण  आहे ! ' .

खरे  आहे हि कृषी संस्कृती चे घट हे  छोटे रूप   आणि त्यातील उगवून आलेले तुरे आजही लहान मुलासारखे टोपीत मिरवावेसे  वाटतात ....

विजयादशमी ,सीमोल्लंघन ..दसरा ! वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याची आपली प्रेरणा अक्षय राहो ,हीच शुभेच्छा !

सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा ..

Tuesday, January 29, 2013

आज गावचा बालमित्र बी  एम डब्ल्यू  घेवून भेटायला आला.छोटी सैर मुलाबरोबर आणि फोटोसेशन  अर्थातच झाले.गाडीतील ऑडियो सिस्टीम उत्सुकतेने ऐकली ...फार मजा  आली नाही.मित्राला म्हणालो 'गावी टकारा TKR  कंपनीच्या कारटेप  ला स्पीकर भोवती मडकी -खोकी लावून पान पट्टीत देखील जो ' इफेक्ट ' आणला जायचा ,त्याची सर या गाडीतील म्युझिक  सिस्टीम ला नाही गड्या ! '  ...आणि खळखळून हसत आम्ही जुन्या आठवणीत रमून गेलो..!

Tuesday, January 22, 2013

 शाळेचा पहिला दिवस...


सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस...आदित्य आणी अविरत निघाले शाळेत. .! मला आठवते आमच्या जावळी तालुक्यात सुट्टीनंतर शाळा भरायची तेव्हा पहिले काम प्राणी -पक्षांनी खराब केलेल्या वर्गांची स्वच्छता हे असायचे .आता पुण्यात शाळेचा पहिला दिवस म्हणजे त्यांचे स्वागत,आरती ओवाळणे,आनंददायी शिक्षण वगेरे ! वक्त वक्त कि बात है !
 
15june 2012

Friday, January 18, 2013

एक आठवण: रथ सप्तमी उपवास सूर्य पूजनाची ..
आणि गावची !


पुण्यात पत्रकार असलेला जावळी तालक्यातील एक मित्र गावी निघणार आहे.तो गावी जाणार म्हटल्यावर माझा हळवा कोपरा जागा होवून थेट झोंबणारया थंडीतील रथसप्तमी उपवासांच्या आठवणीत शिरला...!
आमच्या आजोळी जावळी तालुक्यात रथसप्तमी च्या काळात घरोघरी महिला सूर्याचे उपवास करतात.माझी आई पण करायची...रथसप्तमी ला अंगणात रांगोळी काढण,सुर्य प्रतिमा रेखाटून त्यावर गोवऱ्या ठेवून मातीच्या भांड्यात दुध उतू जाई पर्यंत तापविण्याचा विधी केला जाई. ( उगवत्या सूर्याचे हे उपवास माघ शुद्ध प्रतिपदेपासून सप्तमी पर्यंत केले जातात.सात दिवसांच्या या उपवासाला खेडोपाडी ममई (मुंबई) वरून सफरचंदे,सुका मेवा येत असे .वर्षातून एकदाच त्याचे दर्शन होई...सूर्याला अनेक नवस बोलले जातात.माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जन्मापूर्वी आईने असे उपवास कारण नवस बोलले होते.! ) त्या आठवणीने आज उगाच मन भूतकाळात शिरले...डोंगराच्या कुशीत बोचरी थंडी पडलीय..शिवारात शाळू -हरभरा-पावटा डोलतोय...कौलारू घरातून सीताबाई -फुलाबाई अंगणात आल्यात...गुरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज येतोय...जमेल तशी सूर्य प्रतिमा (' सुर्वे ' देवाची ! ) रांगोळीने रेखाटून गोवऱ्या प्रज्वलित केल्या जात आहेत... सुगडीत दुध उतू घालवताहेत..दूरदेशी असलेल्या नवऱ्याच्या -मुलांच्या साठी नवस बोलले जाताहेत..गोवऱ्यांचा धूर होतोय ... प्रसादाची देवाण -घेवाण होतेय...गोवऱ्याच्या धुराने ,सग्या -सोयऱ्यांच्या आठवणीने डोळे पाणावत आहेत...( तेव्हा गोवऱ्याच्या धुराने त्यांचे आणि आज आठवणीनी माझे..! )

Wednesday, January 16, 2013

माझ्या शाळेचे नाव होते ' जीवन शिक्षण विद्या मंदिर ' !

खेडेगावात अशीच नावे असतात...अशी नावे देण्याची ज्या कोणाची कल्पना असेल,त्यांना आज शिक्षक दिनी खणखणीत सलाम !   

 तेथील शिक्षकांनी काही संस्कार वगेरे केले नाहीत....आम्हीच सारवलेल्या जमिनींवर बसायचो आम्ही शाळेत ..मला सातवीपर्यंत भागाकार पण येत नव्हता .

त्या शिक्षकांमध्ये विशेष  काही नव्हते .पण त्या शाळा,ते पाढे...मोडलेल्या पेन्सिली...हातावर घेतलेल्या छड्या, वार्षिक परीक्षा बुडवून खालेल्या कैऱ्या..      तो परिसर,ते डोंगर,झोडपून काढणारा पाउस . ,ते गोठे,ते सण ,ते गाव ....त्या साऱ्यांचे जीवनाला   Live ...थेट भिडणे ,यात मजा होती ! 

माझे शिक्षण अजून चालूच आहे.
........शाळेचे नाव आहे :जीवन शिक्षण विद्या मंदिर !

Missed all on ' Happy Teachers Day !

5th sapt 2012
परवा खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त भल्या सकाळी  नगरसेविका नंदा लोणकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.

त्याआधी माउंट कार्मेल शाळेत विद्यर्थ्यांनी पर्यावरण विषयावर नाटुकले सादर केले ...सत्कार,भाषणे,...घड्याळाचा काटा पुढे सरकत होता.पुढचे ढीगभर कार्यक्रम डोळ्यासमोर दिसत होते.

सभागृहापासून वृक्षारोपण स्थळ टेकाडावर असल्याने सर्व ताफा झप झप चालत निघाला...एक अनामिक ,निशब्द ताण वातावरणात उगाचच तयार झाला होता...
चालताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते...तो  ताण दूर करण्यासाठी मी शब्द शोधले ,' काय वंदनाताई, तुमच्या वाढदिवशी वृक्षारोपणा बरोबर ' नेचर वाक ' (nature walk ) पण नंदाताईंनी आयोजित केलेला दिसतोय ! 
.
....वंदना ताईंच्या पर्यावरण प्रेमाचा आणी वृक्षारोपण स्थळाकडे टेकडी वर चालण्याचा संदर्भ लक्षात घेवून सर्वच ताफा खळाळून हसला ! वातावरण अधिकच खुलले ....

 अनामिक ताणाचा निचरा झाला...
पण तेथे असल्याचा तेवढा तरी उपयोग.... !

अगदी डोळ्यादेखत 
ज्येष्ठ कवयित्री ( आणी आचार्य अत्रे यांच्या कन्या ) शिरीष पै यांच्याशी फोन वर खूप छान बोलणे झाले...२००० ते २००२ या काळात त्यांच्याशी लेखांच्या निमित्ताने खूप चर्चा -भेटी व्हायच्या .

शिवाजी पार्क जवळ समुद्र किनार्यावरील त्यांच्या घरी नेहमी भेट होत असे

...प्रदीर्घ काळानंतर हि त्यांनी मला ओळखले ,आवाज ओळखला याचा आनंद आहे...गुरुवारी त्यांची ' थेट भेट ' होणार आहे...जुन्या स्मृतींना उजाळा...

' तुमचे येणे कमी झाले ,आणी माझे लेख लिहिण्याचे जवळ जवळ थांबलेच ',असे त्या म्हणाल्या तेव्हा वाईट वाटले...त्या बोलायच्या आणी मी शब्दांकन करायचो ,असा काल होता तो.

महाराष्ट्रातील २५ तरी मान्यवरांना असे शब्दांकन द्वारे लिखाण करायची सवय आमच्यामुळे लागली होती...

मराठी दैनिकांना सहजगत्या मोठ्या व्यक्तींचे लेख मिळायचे .आता आम्ही ' न्यूज अजेन्सी ' म्हणून पुढे आल्याने बातम्याच्या मागे गेलो .आणी लेख लिहिणे ,शिरीष ताईंचे काय आणी माझे काय ,थांबलेच ...

कधी कधी विषय खुणावतात,शब्द जुळतात...पण त्याचा लेख होण्याची बैठक जुळत नाही ....... '

' लेखांचे दिवस ' आठवले कि डोळ्यात हळुवार पाणी येते खरे.

नकळत आपण बरेच काही गमावत असतो...अगदी डोळ्यादेखत


--

Monday, January 14, 2013

----------------------
अनुभव .. अनुभव .... अनुभव .काल रविवारी दिवसभर महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (कोथरूड) च्या शांत परिसरात डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ.सदानंद मोरे,अनंत दीक्षित अशा मान्यवरा समवेत गांधी विचार ऐकत दिवस व्यतीत केला.दुपारी माहितीपट पहिला .सायंकाळी  गांधी सप्ताहाचा समारोप झाला.डॉक्टर सप्तर्षी यांच्या बोलण्याची सोबत दिवसभर होती...चंद्रशेखर ,भारत यात्रा,गांधी ,नथुराम ,गांधी विचार केंद्राचा महाप्रकल्प ,अण्णा ,अविनाश धर्माधिकारी ,केजरीवाल असे नानाविध विषय त्यात येत होते...तरुण कार्यकर्त्यांचे 'युक्रांद ' अवती - भोवती होते....जेवण एका कम्युन सारखे केले..सायंकाळी चहा त्यांच्याबरोबरच....खूप दिवसांनी इन शर्ट काढून झब्बा घालून कार्यकर्ता झाल्या सारखे वाटले...मस्त फकिरी दिवसभर !
---------------

जेव्हा चांगले प्रयत्न,प्रयोग,काम  मूक पणे होत राहतील ,तेव्हा आपण अंधारात एखादे 'पाप ' करण्याइतके ते भयंकर आहे ,असे माझे आणखी एक 'नम्र ' मत आहे..चांगल्या गोष्टी बोंबलून सांगा जगाला...कळू द्या सारे सकारात्मक प्रयत्न .बाजूला पडू नका ....सेंटर स्टेज वर या ....गाजवा नव्या क्रांत्या ...करा गहजब ....दिपवून टाका अंधाराला तुमच्या कामाने ....लाजता कशाला बुवा ?
----------------------
अनुभव .. अनुभव .... अनुभव ...(फक्त आजचेच )

अनुभव १.
 मी लिफ्ट पकडत असताना  सकाळी सोसायटीची कचरावेचक महिला तिची बकेट घेवून लिफ्ट जवळ थबकली .मी चला म्हटले तर म्हणल्या ,' तुम्हाला चालेल का ?' (बहुतेक जण बकेट बरोबर लिफ्ट प्रवास टाळतात !)  मी म्हटले 'अहो हा कचरा आमचाच आहे,त्यासोबत लिफ्ट मध्ये जाण्यात मला काही त्रास नाही.तुम्ही चला बकेट घेवून ' .थोडा खिन्न झालो... मला वाटले हि नवी अस्पृश्यता, काही सेकंदांची, समाजात तयार झाली आहे का ? '
---------------------------
अनुभव २.
विजय पांढरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम केल्याने अनेक जणांना कसे रियाक्ट व्हावे कळत  नाही.मला वयक्तिक पातळीवर त्यांच्या धाडसाचे आदर युक्त कौतुक तर वाटतेच ,पण जे सत्य आहे,जे कायदे आहेत,आणी जी लोकशाही आहे...त्या पद्धतीने पुढे गेलेच पाहिजे .' व्हिसल ब्लोअर ' या दुर्मिळ घटकाचे स्वागत तर करूया ...चौकशी नंतर काय सत्य समोर यायचे ते येवूद्या 
----------------------------------------
अनुभव ३. 
:पुण्याच्या रानडे इंस्तीटयुत(पुणे विद्यापीठ )  या पत्रकारिता महाविद्यालयाचे ३ विद्यार्थी पुण्याच्या टेकड्यांचा  विषय लिहायचा म्हणून मला भेटायला आले ( मी सेव्ह पुणे हिल्स इनिशिअतिव्ह  ' या संस्थेचा निमंत्रक आहे )...विषयातील गुंतागुंत त्यांच्या लक्षात येईल तेव्हा येईल, पण त्यांचे ताजे चेहेरे ,काही ऐकायची ,नवे प्रश्न विचारण्याची ओढ पाहून फार बरे वाटले ...
-------------------------------------------
अनुभव ४
. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय सूरकर यांचे ताणा मुळे निधन झाले .हे झाले तेव्हा मी त्यांच्या टीम मध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्राबरोबर होतो.एक श्रेष्ठ दिग्दर्शक तर आपण गमावलाच .पण मराठी च्या जुन्या दु :खाना पुन्हा खपली काढते झालो .( सूरकर दिग्दर्शित 'लाठी ' या रेगाळलेल्या      चित्रपटात सचिन खेडेकर च्या नातूची भूमिका माझ्या मोठ्या मुलाने -आदित्य ने केली आहे.त्या निमित्ताने सूरकर यांचा सहवास त्याला नि मला मिळाला होता .सुरकरांच्या पश्चात     पहिली  चांगली  भूमिका पडद्यावर येण्यासाठी आदित्यला किती वाट पहावी लागणार ,कोण जाणे  ?) 
--------------------------------------------------
अनुभव ५:
सुफी संगीताचा कार्यक्रम पी ए इनामदार यांनी हिकमतीने  पुणे फेस्टिव्हल मध्ये घडवून आणला..खूप गर्दी  झाली.पण दरवर्षी 'मुशायरा ' आणी शेरो -शायरी ' हा सहज आवडणारा प्रकार पाहायला येणाऱ्या मंडळीना 'सुफी ' संगीतातला ,शब्दातला अर्थ गर्भ लवकर कळलाच नाही..फक्त सहज सोपे च आपण देत राहायचे का ?
---------------------------

तेवढीच जाणीव !

' राष्ट्रीय दृष्टिहीन संघ - ' ग्रांट ए स्माईल फौंडेशन ' आणी रोटरी क्लब ऑफ पुणे सेन्ट्रल ' आयोजित ब्रेल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संयोजक आणी जिंदादिल समाजसेवक  अनिल बोरा यांनी माझा छोटेखानी सत्कार केला.मला संकोच वाटला. ...

त्यांनी आपल्याला फुले द्यावीत इतके आपण दृष्टिहीन बांधवांसाठी काही केलेलं नाही...जाता -जाता काही गोष्टी केल्या .पण आणखी  केले पाहिजे असे मात्र बोचत राहिले... डोळस मंडळीना वाचायला लाखो पुस्तके आहेत..पण अंध बांधवाना ब्रेल लिपीत फारसे काही नाही.

माझ्या कार्यालयात मी हौसेने फोटो -बिटो लावायला निळाशार छानदार नोटीस बोर्ड घेतला आहे... पाडव्याला .सहा महिन्यापूर्वी.तेव्हा 'जागृती ब्रेल प्रेस ' चे  आळंदी येथे उद्घाटन झाले होते.मी सणाच्या दिवशी आवर्जून गेलो होतो..आल्यावर उद्घाटनाच्या दिवशी ब्रेल मध्ये छापलेल्या अभंगाच्या ओळी चा कागद त्यांनी मला भेट म्हणून दिला होता. तो ब्रेल अभंगाचा कागद माझ्या नव्या बोर्डावर लावला.

खरे सांगतो, आजतागायत दुसरे काहीही त्या बोर्डावर लावावेसे वाटले नाही....तेवढीच जाणीव.आपल्या बांधवांसाठी  आपल्याला अजून काही करायचे आहे याची .

--
एक अति वृद्ध स्वातंत्र्य सैनिक गच्चीत उभे आहेत..हात थरथर करतोय...पाउस तुफान पडतोय ...खाली पाहतात तर चिमुकल्यांची टोळी भर पावसात त्यांना 'सलाम नमस्ते ' करतेय ! हो ,१५ ओगस्ट आहे त्या दिवशी...आजोबा गहिवरून येतात..उत्तरादेखील थरथरता हात कपाळा  जवळ नेतात...डोळ्यात अश्रू ...' इस देश को रखना मेरे बच्चो सम्हाल के ! असे गीतसंगीत ऐकू येते ..पाउस चालूच ....चिमुकल्या टोळीचा हात अजून नमस्ते करतोय...स्वातंत्र्य सैनिक आजोबांचा हात अजूनच  थरथरतोय      ( लाईफ ओके वाहिनी वरील हि जाहिरात पाहून डोळ्यात पाणी येते खरे...काही कलाकृती चा ठसा विसरता येत नाही...पुन्हा सलाम नमस्ते...)
( याच वाहिनीवर माझ्या जावळी तालुक्यातील दारूबंदी ची चळवळ त्या दिवशी लाईफ ओके 'वाहिनी वर ,याच कार्यक्रमात  दाखवणार आहेत...त्यातील तरुण लढवय्ये विलासबाबा जवळ यांना आम्ही पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देवून गौरवले होते...इस देश को रखना मेरे बच्चो सम्हाल के ....१५ ओगस्ट रोजी लाईफ ओके जरूर पहा...लाईफ ओके होण्यासाठी अशा बऱ्याच चळवळीना तळहाताच्या फोडा सारखे जपायला हवेय...   )
--------
मृणाल ताई गोरे :एक किस्सा ! :

मृणाल ताई गोरे यांना लेखाच्या निमित्ताने भेटायची संधी नेहमी यायची ..त्या शांतपणे बोलत असायच्या..अवचित काही आठवणी निसटून यायच्या..! एकदा त्या म्हणाल्या ,'सार्वजनिक हिशेबाच्या बाबतीत आम्ही उभयता (पती -पत्नी ) खूप काटेकोर असायचो.रोज रात्री झोपण्यापूर्वी हिशेब पूर्ण झाला पाहिजे ,असा कटाक्ष असायचा .(न जाणो कोण एकाचा रात्री मृत्यू झाला तर ....हिशेब अर्धवट नको राहिला ...) ब्बाप रे आजही हि आठवण अंगावर शहारा आणते...सार्वजनिक कार्यात आता  इतके पारदर्शी कोण वागणार ?
-------
जलजले उंचे उंचे मकानात गिरा देते है....
मै तो बुनियाद का पत्थर हू !
मुझे फिक्र क्या  ?
-------
गैरसमज  

' मला एक गैरसमज दूर करायचाय.तो म्हणजे बातमीदाराने नि पक्ष असावे  हा.
असे निपक्ष वगेरे काही नसते .
असलेच तर निरुपयोगी असते.
पत्रकाराने पक्षपातीच असायला हवे ..
हा पक्षपात पीडितांच्या बाजूने असावा..हे पिडीत मग सरकार किवा अन्य कोणा मुळेही  झालेले असोत.
आपण त्यांच्या बाजूनेच उभे राह्यला हवे..! -रोबर्ट फिस्क :प्रसिद्ध पत्रकार .

( गिरीश कुबेर यांच्या आजच्या 'बुक अप ' सदरातून ....)
---------------

एक अविस्मरणीय मैफल...

हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढली होती...आळंदी मधील अंध मुलींसाठी असलेल्या जागृती शाळेत पोहोचलो.अंध जनांना मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होता...गरम होत होते...मान्यवर उशिरा येणार असा अंदाज आला होता...तोपर्यंत स्टेज वर तबला आणी पेटी घेवून दोन अंध बंधू चढले...एकाच्या डोळ्यावर गोगल काळा...(त्यांच्या डोळ्याच्या खाचा पाहून डोळस लोकांना मानसिक त्रास होवू नये म्हणून घेतलेली खबरदारी ...) ...तबला ठोक ठक करून झाला ,पेटी उघडून झाली...मान्यवर तरीही पोचले नाहीत...तोपर्यंत  त्या दोघांनी हळूच कोणती तरी अनवट सुरावट अगदी हळू सुरु केली...उपस्थित गप्पा मारण्यात मश्गुल.व्यासपीठावरील या जोडीला त्याचे काय ? ते एकमेकांच्या साथीने जणू सराव करीत असल्यासारखे ...दोघांची मैफल हळुवार रंगवत होते.कोणाचेच लक्ष नव्हते. असे वाटले प्रमुख पाहुणे आले नाहीत तरी या दोघांचे काही अडणार नाही.त्यांची मैफल स्वताच्या आनंदाची चालूच राहील...अशी हळुवार तान, मंद सुरावट आणी भवताल विसरलेले ते दोन शापित गंधर्व काल माझ्या डोळ्यासमोर होते ...आळंदीतील ते  परमे ' सूर ' पाहिले आणी नकळत डोळ्यात पाणी तरारले ....खर सांगतो .
अनेक दिग्गजांच्या मैफली  सवाई गंधर्व पासून दिल्लीपर्यंत मी अनुभवल्या...पण कालची मैफल,आणी पाणी डोळ्यासमोरून हटत नाही ... 
------------------------------

--

हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय?

आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायचा माजे आटला होता पान्हा !
पिटा मंदी र पिटा मंदी ! पिटा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय! तवा मले पिटा मंदी दिसते माझी माय?

... तान्या काट्या वेचायला माय जाई राणी ! पायात नसे वहान तिच्या फिरे अनवाणी ! काट्या कुट्या र काट्या कुट्या ! काट्या कुट्याला हि तीच मानतनसे पाय ! तवा मले काठ्यामंदी दिसते माझी माय ?

बाप माझा रोज लावी मायचा माग तुम्ह्ना बस झाल शिक्षण आता घेऊ दे हाती काम ! शिकुंषण र शिकुंषण ! शिकुंषण कुठ मोठा मास्तर होणार हाय ?
तवा मले मास्तरामंदी दिसते माझी माय ?

दारू पिऊन मायला मारी जवा माझा बाप ! थर थरार कापे अंग छातीला लागे धाप ? कासयाचा र कासयाचा ! कासयाचा गाव्रणी ला बांधली जशी गाय ! तवा मले गाईमंदी दिसते माझी माय ?

ग बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी ! संग म्हणे राजा तुजी दिसेल कवा राणी ? भर्या डोळ्यान भर्या डोळ्यान ! भर्या डोळ्यान जवा पाहीन दुधा वरची साय तवा मले साईमंदी दिसते माझी माय ?

हंबरून वासराले! म्हणून म्हणतो पुन्हा एकदा भरावी तुजी वटी! पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी ! तुझ्या चरणी , तुझ्या चरणी! तुझ्या चरणी ठेऊन माथा धराव तुज पाय ? तवा मले पायामंदी दिसते माझी माय ?

हंबरून वासरले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय 

-------------
ध्येयाचा सुगंध लाभला जीवना ,आता समर्पणा पूर्ण व्हावी ...

क्रोध ,अहंकार ,जावो निरसून 
विशुद्ध कांचन ,उजळावे  

इर्षा, असूयेला नाही येथ स्थान 
निर्मळ चैतन्य खळाळते ...
-----------
एका ट्रिप ची गोष्ट:-

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.”
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.”
आजोबांनी (बॉसने)त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ”हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”बाहेरगावी जाणे रद्द.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”आपली भेट रद्द.”
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ”माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.”
आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ”माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता…...:D :D :D

-------
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

--
आज पोळी भाजताना,
वाफ बोटावर आली,
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
डोळ्यातल्या सरितेला,
पूर येई असा काही,
... भावनांच्या सागराला,
कळे भरती आली .....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
पायी चालता वाटेने,
रुतता काटा पावलात,
माझ्या आईच्या भेगांची,
मज आठवण झाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
धुता कपड्यांचा ढीग,
जाई निघून हा जीव,
मज स्मरे माझी माउली,
अशाच कष्टातच न्हाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
आई म्हणालीच होती,
करता माझी पाठवणी,
आले घरी माझ्या सूख,
पोरी तुझ्याच पाऊली,
नुसत्या विचाराने आज,
होते पापणी ओली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली..

..............
ढाण्या वाघाचे निधन...
मी वाघ पहिला होता ! 


नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या निधनाने चटका लागून राहिला आहे...नागनाथ अण्णा हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते,प्रती सरकारसाठी लढलेले नाना पाटील यांचे सहकारी होते,पण हि झाली औपचारिक ओळख .नागनाथ अण्णा हे शेतकरी,कष्टकर्यांचे ढाण्या वाघ होते...

मी लहान असताना (११ वी मध्ये ) ते कराड लोकसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिले होते...त्यांच्या कष्टकरी कार्य कर्त्यांनी प्रचाराचा ' जलवा ' तयार केला ...खाकी शर्ट आणि धोतर परिधान करून वावरणारे आणि शेतकऱ्याचे अस्सल प्रतिनिधी वाटणारे नागनाथ अण्णा आले कि गर्दी गोळा व्हायची...त्या प्रचारात नागनाथ अन्न्नांच्या कार्य कर्त्यांनी निवडणूक चिन्ह म्हणून चक्क खरा ' वाघ ' मतदार संघात फिरवला होता ,असे आता आठवते ! साधना मधील त्यांच्या वरचा लेख हि आठवतो आहे...एक गूढ लयाला गेले आहे..

....आता वाटते नागनाथ अण्णा यांच्या रूपाने आपण खरेच वाघ पहिला होता ! त्यांना विनम्र अभिवादन... 
...........
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती 
म्हणून भीती नाही पराजयाची 
जन्मासाठी हटून नव्हती बसली 
म्हणून तिजला  नाही खंतही तिजला मरावयाची ....(कुसुमाग्रजांचे स्मरण,मराठी भाषा दिनानिमित्त )
..............
भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
आज चा दिवस 'प्रचीती गप्पांचा ' आणि 'गप्पातून  प्रचीती ' येण्याचा...!
ज्ञान प्रबोधिनीच्या 'प्रचीती ' या युवा संघटनेत आम्ही जवळ जवळ २०० युवक-युवतींनी डॉ.विवेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसन हेच तत्वज्ञान ' आणि 'समन्वय हीच कार्यपद्धती ' चे धडे प्रशिक्षण आणि  कृतीतून गिरवले ...ज्यात झोपड पट्टीतील काम होते,ग्रामीण प्रज्ञा विकास,स्पर्धा परीक्षा केंद्र ,संवाद मासिक,संघटन,अभ्यास शिबिरे ,अभ्यास दौरे,आदिवासी भागात १०० दिवसांची पदसरे शाळा ,उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी १०० दिवसांची साखर शाळा असे खूप काही होते.त्यालाच अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि अविनाश धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनातील पदार्पण अशा अनौपचारिक अनुभवांचा -सहभागाचा समावेश होता.देश प्रश्नांचा अभ्यास करताना अगदी ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यास दौर्यापासून काश्मीर प्रश्न अभ्यास दौरयापर्यंत जाणिवांचा प्रवास होता.'भविष्य वेध ' (फ्युचरालॉजी ) काही अभ्यास केला..

या युवा गटातील अनेक जण आज स्वयंसेवी संस्थांबरोबर मोलाचे काम करत आहे.अनेक जण प्रशासन ,प्रसार माध्यमे आणि शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत.समाजातील प्रश्नांवर काम करायचे तर अशीच क्षेत्रे निवडून आयुष्यभर काम करायचे अशी जवळपास 'शपथ ' च आम्ही मंडळीनी घेतली होती...आणि तिचे पालन करीत आहोत.

साधारण वर्षातून आम्ही सारे भेटतो...अनौपचारिक गप्पा मारतो.यंदा ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव आहे...त्या पार्श्व भूमीवर आणि त्या वस्तू मध्ये होणारी आजची बैठक -गप्पा मला खूप महत्वाची वाटते .१९९० च्या दशकातील मधले हे सारे प्रशिक्षण -अनुभव ,२००० नंतर दशकभर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करून आता  २०१२ नंतर च्या परिस्थिती वर काय काम करता येईल असा जणू अंदाजच  आम्ही घेत आहोत...

म्हणून आज ' प्रचीती गप्पा ' आणि ' गप्पातून प्रचीती '   !


..........
25/09/2012
पेपर विना ,दिवस सुना !
मी वाघ पाहिला  होता ...

बाळासाहेब हजरजबाबी होते...सत्तेवर  असताना साताऱ्यात पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकाराने माहितीवजा प्रश्न विचारले ' येथील चिखली धरणाचे काम इतके निकृष्ट झाले आहे कि बोटाने पण भिंतीचे सिमेंट निघते ! '
बाळासाहेब मिश्किलपणे उत्तरले -' धरणाचे नावात  चिखल  आहे न ,मग बोटाने  निघणारच ! '

वाघ  फक्त डरकाळी फोडत  नसे ,तर हास्याची  लकेर  हि निर्माण करत असे...

बाळासाहेब  ठाकरे  यांना  ,त्यांच्या  नेतृत्वाला ,कर्तृत्वाला ,वक्तृत्वाला आणि  कलागुणांना  महाराष्ट्र  विसरणार  नाही....

-----------------
आई- बाबांचा फोन आला होता..पालगड या आमच्या कोकणातील गावी शेतातील भात पिक काढले आहे म्हणून....माझ्या डोळ्यासमोर लगेच हिरवे -पिवळे शेत ,ओली  माती...अंगण भरून भाताच्या पेंढ्या ....असे सारे.. उभे राहिले..त्याचा गंध मन भरून गेला..आई ने फोन केलाच पण हे गीत पण ऐकवले ....

' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '

आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .

19/10/2012