Sunday, March 24, 2013


क्या स्वाद है जिंदगीका ! 

उन्हाळा म्हणजे काही ठरलेली कामे गृहिणी ना करावी लागतात . त्यातील मसाले तयार करण्याचे काम 'सौ ' जन्याने पूर्ण झाले आहे .

माझी पत्नी गौरी आणि तिची बहिण गायत्री यांनी दोन्ही घरी वर्ष भर पुरेल असा तिखट आणि गोडा मसाला करून 'साठे बाजी ' करून ठेवली आहे ! त्यातील कांदा लसूण मसाला हि माझी फेवरीट मसाला रेसिपी आहे .सारवलेल्या अंगणात लाल भडक मिरच्या ,तेल लेवून ,तड तड्त्या उन्हात मस्त पहुडल्या आहेत,अशी (न ) काढलेली फोटो फ्रेम माझ्या मनात अजून ताजी आहे .

डंका तून मिरच्या कांडप करण्यापासून ,कांदा परतणे ,खोबऱ्याच्या काचऱ्या तळणे ,लसूण परतणे ,गरम मसाला तयार करणे नंतर 'तिखट मिसळणे ' असे अशा अनेक प्रक्रियातून तयार झालेला हा जहाल तिखट कांदा लसूण मसाला सातारा पद्धतीने आमच्या कडे केला जातो .( शेवटी हे तिखट मिसळताना हाताची लाही -लाही होते !) आमची आई हा मसाला जावळी परिसरात शिकली … जावळी -साताऱ्याच्या भूमीचा झणझणीत स्वाद आम्ही लहानपणी अंगिकारला । ( काही स्वाद आणि संवेदना थेट आईच्या पोटातून घेवून आपण जन्माला येत असतो )

तो आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे . आणि आता आम्ही तो पुण्यातील 'गोड्या'' कुटुंबात पण लोकप्रिय केला आहे . चित्पावन गौरीशी प्रेम विवाह झाल्यावर आंबट -गोड चवीची गम्मत मी शिकलो आहे आणि झण झणित थरार गौरी शिकली आहे !कोणत्याही भाजी -आमटी ची चव या मसाल्याने तयार होते . भरली वांगी ,बटाटा रस्सा ,डाळ -कांदा ,पावटा ,घेवड्याची रस्सेदार आमटी आदी रेसिपी तर या कांदा लसूण मसाल्याशिवाय सिद्धीस जात नाहीत . गरम भाकरी बरोबर दही -चटणी हा मेन्यु तर 'खल्लास ' लागतो ।

पण माझ्या लहानपणी एका गरीब मित्राने ,डोंबारयाच्या झोपडीत शिळा भात -लाल कांदा लसूण मसाला एकत्र करून त्यात तेलाऐवजी पाणी टाकून,कालवून खायला शिकवले होते ! ( तेल जपून वापरायचे लोक .तेव्हा गोडे तेल ही ' प्रेशस कमोडीटी ' होती त्या कुटुंबाना … )
त्याची आठवण आली की भातात लाल कांदा -लसूण घेतो मी, सर्वांची नजर चुकवून त्यात थोडे पाणी तेला ऐवजी मिसळायला घेतो ।
हा तिखट कांदा मसाला लसूण खाताना डोळ्यात पाणी येते ,ते सारे तिखट पणामुळेच असते असे नाही . काही आठवणी पण त्यात 'मिसळलेल्या ' असतात . ..



हा मसाला तयार झाला हे ओळखण्याची खूण त्याचा दरवळ हि असते…. हा कांदा -लसूण मसाला उर्फ 'तिखट ' टेस्ट करताना जिभेवर थरार निर्माण झाला ,मेंदूत करंट निर्माण झाला … मनात झण झणित आनंद लहरी उठल्या आणि कानशिले गरम होवून तोंडाला पाणी सुटले की समजावे -बात बन गयी है !

'तिखट मिसळणे ' हा उत्सवच असतो. हा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी बटाटे वडे करण्याची नवी प्रथा मी आमच्या 'बिडकर ' घराण्याला सुरु करून दिली आहे !

वडे संपला कि कांदा लसूण मसाला करायला घ्यायचा आणि तो संपत आला कि वडे तळायला घ्यायचे !

क्या स्वाद है जिंदगी का !


 क्या स्वाद है जिंदगीका !

No comments:

Post a Comment