Monday, December 15, 2014

एक पोस्ट चिमणराव कदम यांच्यासाठी . .
--------------------------------
चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षाला साजेसा अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्वांचे पर्व संपले . अर्ध चंद्रकोर लावून ,पांढरे धोप कपडे घालून सूर्याजीराव तथा चिमणराव कदम बाहेर पडले कि त्यांच्या तेज नजरेच्या आणि वाणीच्या पट्ट्यात शक्यतो आपण येवू नये अशी काळजी घ्यावी लागायची . फलटण मध्ये ' कार्यकर्ते कमी आणि विविध पक्षीय नेते जास्त ' अशी अवस्था . त्या अवस्थेतून त्यांनी विधानसभेवर निवडून येत सभागृह गाजवले . 1980 ते १९९५ पर्यंत हे वादळ राजकारणात घोंघावत होते . (एकदा सातारी राजकारण्यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढण्यासाठी थेट इंदिराजी च्या समोर दिल्लीत उभे केले आणि कदम यांनी त्यांना विनम्र नकार दिला तो यशवंतराव यांच्या आदरापोटी ! अशी आठवण आता कॉंग्रेस कार्यकर्ते काढत असल्याचे परवा बाबुराव शिंदे यांनी whats ap सांगितले . )
कृष्णा खोऱ्याचे पाणी पळवणारे नेते त्यांच्या शाब्दिक असुडांचे बळी ठरत . बारामतीचे शरद पवार आणि फलटणचे चिमणराव कदम यांचा लढा भिन्न व्यक्तिमत्व ,भिन्न विचारसरणी चा होताच पण बांधावरचा देखील होता . कृष्णा खोऱ्याच्या आणि करारांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ब्रिटीश लायब्ररीत कसे संदर्भ मिळवले हे चिमणराव रंगवून सांगत . टाटा इश्टेट गाडीत बसून -झोपून ते फलटण -मुंबई ,फलटण -पुणे ,फलटण -नागपूर असा प्रवास करायचे
अर्थात अशी अभ्यास करायची कॉंग्रेस ला सवय नव्हतीच . त्यामुळेच ते मुलुखमैदानी आणि मुलुखावेगळे ठरत . २००४ साली सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली . शिरीष चिटणीस आणि श्रीकांत कात्रे या मित्रांनी माझी,मी पुण्याला स्थायिक असताना देखील आणि चिमण रावांची मोट बांधली ,मला त्यांचे निवडणूक प्रसिद्धीप्रमुख केले आणि मुलुखमैदानी तोफेच्या तोंडी दिले !
laptop ,mobile ,digital कॅमेरा ,email यातील काहीच त्या परिसरात नव्हते त्यावेळी (म्हणजे दहा वर्षापूर्वी ) लिहिलेले वृत्तांत पेपरच्या कार्यालयात पोचणे हे रोजचे दिव्य होते ,
आपला प्रसिद्धीप्रमुख ,माध्यम सल्लागार म्हणजे काय हे सुरुवातीला चार दिवस त्यांच्या पचनी पडले नाही . ' तुम्ही माझी भाषणे लिहून पेपरला पाठवणार म्हणजे 'टपाल्या ' सारखे काम करणार ' असे ते खास शैलीत हिणवत ! त्यांची जहरी टीका ऐकून माणसे आत्महत्या कशी करीत नसत किवा चिमण रावांची हत्या कशी करत नसत याचे आश्चर्य मला वाटे .
पण ,नंतर एकाच गाडीत रोज आम्ही बरोबर राहून काम केल्यावर त्यांच्या ध्यानी 'माध्यम सल्लागार ' हा प्रकार आला . आणि मुलुखमैदानी भाषणे झाल्यावर गाडीत बसल्यावर मृदू आवाजात ते मला भाषण कसे झाले ,याचा 'feedback ' घेत . एकाच डब्यातील भाजी -पोळी आम्ही दुपारी कोणत्यातरी झाडाच्या सावलीत खात असू . अतिशय आरोग्यकारक भाजी ,पोळी चा डबा असे तो . दिवसभर वणवण फिरताना घसा खराब होऊ नये म्हणून पाण्याऐवजी कॉफी पीत असत ते .
सर्व प्रचार यंत्रणा एक हाती सांभाळली त्यांनी ! स्वतःच सकाळी ११ पर्यंत सर्वांना हाकून ते नियोजन करत आणि मग गाड्या प्रचाराला निघत .
काँग्रेस चे बंडखोर उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते ,लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी होती . चिमणराव कदम यांची वाट नेहमीप्रमाणे कठीण होती . त्यात निवडणूक काळात उन्हाळा आणि दुष्काळ होता . चारा छावण्या ठीक ठिकाणी पडल्या होत्या . आपली जनावरे पाणी असलेल्या पावण्याकडे खुद्द चिमणरावांनी पण धाडून दिली होती . 'यशवंत परंपरा ' चालवणे आणि लोकसभेत भांडून हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी सातारा दुष्काळी भागाला (दहिवडी -खटाव -माण -फलटण -खंडाळा ) मिळवून देणे हा त्यांचा नारा होता .
बुडत्या काँग्रेस मधून तेव्हा उंदरासारखे नेते बाहेर पळत होते ,अशा वेळी ' मी उंदीर नाही ,वाघ आहे , वेळप्रसंगी कॉंग्रेस चे बुडणारे अख्खे जहाज खेचायची ताकद माझ्या अंगात आहे ,असे ते डोळे फिरवून म्हणत ! आणि रोमांच उभे करीत . अगदी जिगरबाज माणूस . काँग्रेस च्या पचनी न पडलेला आणि जिभेच्या पट्ट्याने सर्वांना घायाळ करीत स्वतःच घायाळ झालेला .
चिमणरावांच्या पत्नी मात्र चिमणराव यांच्या भाषणाच्या बातम्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारख्या लिहा असे म्हणत ! कदम यांचे उजवे हात असलेले सहकारी अच्युतराव खलाटे मात्र चिमण राव कदम यांच्या उलट स्वभावाचे . माणसे जोडणारे आणि मुलायम बोलणारे . त्यांनी मात्र २००४ निवडणूक संपली तरी संपर्क ठेवला . ही राजकारणातील जुनी पिढी . मागे पडली ती पडलीच .
आता सातारा वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या नेत्यांमुळे ओळखला जातो
मात्र ,त्यातील एकही जण 'यशवंत परंपरा ' चालविण्यासाठी मी निवडणूक लढवतोय असे म्हणत नाही . सभ्यतेच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण एव्हढाच काय तो नियमाला अपवाद . कॉंग्रेसचे , साताऱ्याचे, यशवंतराव चव्हाण यांचे आणि चिमणराव कदम यांचे दुर्दैव हेच !
-------------------------
(सोबत :२००४ च्या प्रचारात चिमणराव कदम यांचा माध्यम सल्लागार या नात्याने मी लिहिलेल्या काही बातम्या -मुलाखती . आणि चिमणराव कदम यांच्या प्रचारात सहभागी झालेला -हातात नोटबुक घेवून मुद्दे टिपणारा मी ! )
------------------------------------------


No comments:

Post a Comment