Saturday, March 8, 2014

संडे कब आयेगा ?



रविवार सरला तरी त्याच्या स्मृती सोमवारी रेंगाळत राहतात ..

 जर रविवारी आपण अशा वेगळ्या गोष्टी केल्या कि ज्या आठवडाभर करता येत नाहीत ,तर तो नक्की संस्मरणीय होतो .

मला  खूप रविवार  नंतर अशी संधी  होती .  त्या साठी  शनिवारी  रात्री  ' भाग  मिल्खा    भाग ' सहकुटुंब  पाहिला . ' मटार  भात ' हि शनिवार  रात्रीची  'आपली  आवड ' असल्याने  आदित्य ने त्यावर  ' भात  मिल्खा  भात ' अशी कोटी केली  ! ( पोरगा  हुशार  आहे   )

सर्व रविवारीय वृत्तपत्रांच्या पुरवण्या  वाचून काढल्या . बाल्कनी तून दिसणाऱ्या भव्य मैदानात  रविवारी  भरणारा  साप्ताहिक ' भव्य  क्रिकेट महोत्सव'  पाहिला ! घरात मदत  केली . डोक्याला  भरपूर  तेल  लावले . . देवीच्या  घटाला लागणारी तिळांच्या फुलांची  माळ  तयार केली ..  आणी  गौरी  साठी सकाळी  चहा  केला  ! दीड महिना मला टी  व्ही पाहिला मिळाला नाही . मी हिस्टरी चनेल पाहून ती हौस पूर्ण  केली . 'घर ' या विषयावरील  सुंदर  साप्ताहिक मालिका हिस्टरी वर सुरु आहे . त्यात  काल  विनय पाठक ने वहिदा रेहमान  यांना  त्यांच्या पूर्वजांच्या घरी -गावी नेवून  स्मृतींच्या हिंदोळ्यावर नेले . . डोळ्यात अश्रू आणले .

 गोविंद निहलानींची  'तमस  ' मालिका   पाहिली . उर्मिला पवार यांचे 'आयदान ' वाचून पूर्ण केले .  आदित्य चा अभ्यास घेतला . . ( आणी भरपूर झोप घेतली . . हळीवांचे लाडू खावून ! )

थोडे  संगीत ऐकले  असते  आणी पेंटिंग -फोटोग्राफी केली  असती  तर हा रविवार सुवर्णाक्षराने लिहावा लागला  असता

 पण असा रविवार  चांगला गेला  कि तो  मला  टोचतो ,लगेच  व पु किवा  जयवंत  दळवींच्या  रविवार  वरील एका  कथेची  आठवण होते . .  त्यात असोशीने  रविवार ची वाट  पाहणाऱ्याचा रविवार  कसा  कामे  अंगावर  घेवून  संपून  जातो  ,हे प्रत्ययकारी  लिहिले  होते !  माझे अनेक  रविवार  असे  कामात उडून जातात . .

कालच्या  सारख्या अशा  रविवारीय  संगीत  सभा /वाचन  सभा /कौटुंबिक सभाच हा दिवस अविस्मरणीय  करतात . .

. . . . संडे कब आयेगा  ?

Wednesday, November 13, 2013

लक्ष्मीपूजन ३ :

'प्रबोधन माध्यम ' चे कार्यालय खूप वर्षे एकाच ठिकाणी आहे (सुदैवाने ) . . पण बरीच वर्षे त्याला रंग द्यायला जमला नव्हता . काही दिवसापूर्वी अंगात काही संचारल्यासारखे झाले आणि
एका कार्यालयीन सहकाऱ्याला बरोबर घेवून रविवारी स्वताच्या हाताने कार्यालयाला रंग देवून टाकला !

आज त्या रंगारंग कार्यालयात लक्ष्मीपूजन करताना सजलेल्या भिंती हळूच गालात हसत आल्याचा भास झाला . .

लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे .

लक्ष्मीपूजन !
------------------

लक्ष्मीपूजन करण्याची माझी एक वेगळीच पद्धत आहे . . लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे . . माझ्या कडे चलनात असलेली आणी नसलेली वेगवेगळी नाणी आहेत . . छंद म्हणून जमवलेली !

महाराजांचा होन आहे ,ब्रिटीश नाणी -नोटा आहेत ,त्याच प्रमाणे स्विस आणी इतर देशांचे कॉईन आहे . . मी नेपाळ ,भूतान आणी काश्मीर लगत पाक सीमेवर ,चीन सीमेवर जावून आलो आहे . . पण त्या पलीकडे परदेशात गेलो नाही . . पण परदेशात कोणी
मित्र -नातेवाईक गेले कि मी आवर्जून त्या देशाची एक -दोन नाणी मिळवतो ! त्याचा बरा संग्रह झाला आहे . .

आणी त्यात आणे ,पैसे ,रुपये अशी खूप जुनी नाणी आहेत । खेडे गावात एकट्या राहणाऱ्या माझ्या आईच्या आत्याच्या निधना नंतर मला घरात सापडलेली . . खूप लहानपणापासून आजही मी ती जपून ठेवलीत.
.
त्या नन्तर बारा -पंधरा घरे बदलून सुद्धा हा ठेवा मी जपला आहे

माझ्या पूर्वजांची इष्टेट आहे ती ! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी ती हातात घेतो ,त्यांना न्हावू घालतो ,हृदयाशी धरतो . . पूजा करतो . . आणी हळूच त्यांच्या आशीर्वादाच्या कुशीत शिरू पाहतो. .

तमाच्या तळाशी दिवे लागले !

तमाच्या तळाशी दिवे लागले !
.........................................

. . नॉक औट व्हावे इतके ४ महिन्यांचे काम संपवून आज . रात्री लक्ष्मी पूजनानंतर माझ्या मित्राबरोबर आणि त्याच्या रिक्षा वाल्या मित्राबरोबर जेवायला बसलो . .

तेवढ्यात गौरी चा फोन आला . . आपण ज्या दिवंगत रिक्षा वाल्या मित्राला खूप मदत केली होती ,त्यांच्या पत्नीचा फोन आला होता आणी . . त्या आपल्या घरी दिवाळीची गिफ्ट पाठवत आहेत . .
ऐकून अक्षरश : भडभडून आले . . आपण दिवाळी कुठे पोहोचवली आणि कुठे उगवून आली . . काहीच कळेना . .

तमाच्या तळाशी ,,तळा गाळाच्या तळाशी ...दिवे लागतात तीच खरी दिवाळी . . I SWEAR

Sunday, September 8, 2013

देवा श्री गणेशा ! (Prayer With my New Deaf and Dumb friends )


देवा श्री गणेशा ! (Prayer With my New Deaf and Dumb friends )
---------------------
गणेश हा सर्व विद्यांचा अधिपती आहे . . पण माझ्या या नव्या मित्रांना परिस्थिती -निसर्ग आणि असलाच तर देवाने मूक -बधिर अवस्थेत जगणे दिले आहे .

हे मित्र रोज मला एस पी कॉलेज मैदानावर भेटतात ,

मी एविनिंग वॉक घेत असतो . ते त्यांच्या खुणांच्या भाषेत मस्त गप्पा हाणत असतात एकमेकांशी . हसतात . भेटतात .

एक कट्टा . . एक विश्व आहे त्यांचे . तेथेच रुइआ मूक बधिर विद्यालय आहे . . तेथील विद्यार्थी /माजी विद्यार्थी असावेत .

आज त्यांच्या नुसत्या गप्पा न्हवत्या . . तर ते चक्क गणपती बाप्पाचे सुरेख चित्र रेखाटत होते . . मी फोटो काढायला गेलो तर ,ते लाजून आधी सर्व जण फ्रेम मध्ये येतच नव्हते .

मी जमवून आणले . .

पण त्यांची नावे कळली नाहीत कारण त्यांची साईन लेन्ग्वेज मला कळत नव्हती ( मला खासदार वंदना चव्हाण आठवल्या . त्या मूक -बधिर व्यक्तींशी कामापुरते साईन लेन्ग्वेज मध्ये बोलू शकतात ! आपल्याला पण हे जमायला हवे असे अशा वेळी वाटते

)आणि माझ्याकडे पेन -कागद नव्हता .
पण ते छान हसत -दिसत होते . .

त्यातच मी हरवून गेलो .

माझ्या नव्या मित्रांची नवी अदाकारी ,भक्ती ,श्रद्धा मनापासून पहिली त्यांनी ,हसत -खेळत काढलेल्या बाप्पाला नमस्कार केला

त्यांचा या जीवनातील आनंद चिरकाल टिको ,वाढो ,अशी प्रार्थना केली !

अजून काय पायजे आपल्याला ?

सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

Sunday, July 21, 2013

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार बंदी न्यायालयात टिकली नाही . पुन्हा बार सुरु होणार असे म्हटले जात आहे . एका तरुण अभियंत्याने डान्स बारचा त्या काळात सांगितलेला किस्सा आठवतो . प्रातिनिधिक आहे .
तर हा अभियंता गटाराचे काम मागायला पालिकेच्या संबंधित विभागाकडे गेला . त्याला कंत्राट मिळाले देखील . सायबाला त्याने सांगितले कि माझ्याकडे काहीच पैसे नाहीत . तुम्हीच आगावू रक्कम दद्या . सायबाने रक्कम दिली . आणि अमुक तमुक बार मध्ये दोघे आणि ती रक्कम असे तिघे गेले .

मद्य ,डान्स ,बारबाला या चक्रात सायबाने सर्व आगावू रक्कम उडवून टाकली . हा अभियंता काहीच म्हणाला नाही . हाच त्याचा खंबीर स्वभाव सायबाला आवडला . म्हणाला,' उद्या बरोबर दहा वाजता ऑफिस मध्ये ये . कंत्राटाची सर्वच रक्कम घेवून टाक . . आणि काम सुरु कर . घरी जायला पैसे आहेत का ? नाही हे घे ५०० ची नोट . काळजी करू नको . शांत जाऊन झोप घरी ! '

---------

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

एक मित्र आहे .

एका प्रतिष्ठेच्या ठिकाणी वाद होवून स्वभिमानापायी राजीनामा दिला . माझा अगदी लांबून कधी तरी त्याच्याशी संबंध येत असे.मग हळू हळू सर्वांपासून हा लांब गेला . मी कुतूहल म्हणून संपर्क ठेवला .

हा गायबच असायचा.

कधी एफ बी ,कधी एस एम एस ,कधी भेट असा उगाचच संपर्क ठेवला .

वर्षभरात सगळेच त्याला विसरले .
मी मुद्दाम संपर्क ठेवून होतो .

एकदा रात्री भेटला . त्याच्या वेदनांनी मलाच कसेसे झाले .

तो म्हणाला ,' तुम्ही का मैत्री केलीत माझ्याशी ? का चांगुलपणा दाखवता ? तुम्ही ज्या जातीतले आहात ,त्या जातीत माझी कधीच मैत्री झाली नाही आणि होणार पण नाही . अपवाद तुम्हीच . हे सगळे का केलेत ?

मी हसलो .

म्हणालो ,' अरे मित्रा ,तू तिरीमिरीत गायब झालास . जगावरच रुसलास . बरयाच जणांशी तू संबंध तोडलेस ,अनेकांनी तुझ्याशी संबंध तोडले . हळूहळू तू नजरेआड गेलास . अशा वेळी माणूस जगावर उखडलेला असतो . त्याच्यातील सूडबुद्धी जागी होते . आणि तो कोणावरही ,कशासाठीही सूड उगवू लागतो . अगदी स्वतावरही !

हे होत असताना सगळे जग ,माणसे वाईट आणि स्वार्थी असतात असे वाटत राहते . माणसे वाईट असतात असा ग्रह झाला असता तरी मला चालले असते ,पण माणुसकीवरचा तुझा विश्वासच उडाला असता तर ते मला चालले नसते . . म्हणून मी तुझ्याशी संपर्क ठेवत गेलो

(आणि मग रस्त्यावरच्या रस्त्यावरची पहाट आणखी उजळत गेली ! )